समुद्रात कोसळले श्रीविजया एअरचे विमान, ६२ जणांना जलसमाधी


जकार्ता – इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून पॉण्टिआनलका जाणाऱ्या श्रीविजया एअरच्या देशांतर्गत विमानाचे उड्डाण झाल्यानंतर हवाई वाहतूक नियत्रंण कक्षाशी काही वेळातच संपर्क तुटला. याबाबत इतर प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या चार मिनिटांत समुद्रात कोसळले. ५० प्रवाशी आणि १२ कर्मचारी या विमानात होते. या सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती वर्वण्यात येत आहे.

प्रसारमाध्यांशी बोलताना विमानातील लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला इंडोनेशियाचे परिवहन मंत्र्यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, समुद्रात विमानाचे काही अवशेष मच्छिमारांना मिळाले आहेत. तसेच शरीराचे अवयव, कपडे आणि इतर काही विमानातील गोष्टींही मिळाल्या आहेत. इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांकडे या सर्वांना पुढील तपासासाठी सपूर्द करण्यात आले आहे. यावरुन विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेबाबत माहिती देताना इंडोनेशियाचे परिवहनमंत्री बुदी कारया सुमादी यांनी सांगितले की, नियोजित वेळेपेक्षा एक तास विलंबाने म्हणजेच स्थानिक वेळेनुसार दोन वाजून ३६ मिनिटांनी एसजे १८२ या विमानाने उड्डाण केल्यानंतर चार मिनिटांनी हे विमान रडार यंत्रणेवरुन गायब झाले. वैमानिकाने त्यापूर्वी हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमान समुद्रसपाटीपासून २९ हजार फुटांवर असल्याचे कळविल्याचे सुमादी यांनी सांगितले. १:५६ वाजता जकार्ताहून बोइंग ७३७-५०० या विमानाचे उड्डाण झाले आणि २:४० वाजता त्या विमानाचा वाहतूक नियंत्रण कक्षेशी संपर्क तुटला, असे इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाच्या प्रवक्त्या अदिता इरावती यांनी सांगितले.

शोध आणि मदतकार्यासाठी चार युद्धनौकांसह १२ जहाजे जकार्ताच्या उत्तरेकडे असलेल्या लॅनकँग आणि लाकी बेटांमध्ये तैनात करण्यात आली असल्याचे सुमादी म्हणाले. तर मच्छीमारांना मिळालेले विमानाचे अवशेष आणि कपडे राष्ट्रीय शोध आणि मदतकार्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले असून ते राष्ट्रीय परिवहन सुरक्षा समितीकडे पुढील तपासासाठी सुपूर्द करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या उपग्रह यंत्रणेलाही बेपत्ता विमानाचे ईएलटी सिंग्नल पकडता आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.