त्वचेची काळजी घेताना या सवयी टाळणे आवश्यक


अतिशय नितळ, सुंदर, मुलायम असणारी त्वचा कधी तरी पाहता पाहता निस्तेज, रुक्ष दिसू लागते, या मागे अनेक कारणे असू शकतात. त्वचेमध्ये जास्त ‘सीबम’ तयार होणे, प्रदूषण, असंतुलित आहार, झोपेचे बिघडलेले वेळापत्रक याचे एकत्रित परिणाम त्वचेवर दिसून येत असतात. याशिवाय काही लहान मोठ्या सवयींमुळेही आपल्या नकळत त्वचेला अपाय होत असतो. या सवयी टाळणे आवश्यक आहे.

अनेकांना आपल्या चेहऱ्याला सतत हात लावण्याची सवय असते. पण अश्या वेळी लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी, की आपल्या हातांनी आपण सतत कुठल्या ना कुठल्या वस्तूला स्पर्श करीत असतो. त्यामुळे आपल्या हातांवर निरनिराळ्या किटाणूंचा प्रादुर्भाव होत असतो. सतत चेहऱ्याला हात लावल्याने या किटाणूंचा संसर्ग आपल्या त्वचेवर होत असतो. परिणामी चेहऱ्यावर मुरुमे-पुटकुळ्या येऊ लागतात. त्यामुळे चेहऱ्याला हात लावताना आपले हात स्वच्छ असतील याची काळजी घेणे आवश्यक आहे.

ऋतू कोणताही असो, घराच्या बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे गरजेचे असते. सनस्क्रीनची गरज केवळ उन्हाळ्यातच असते अशी काही जणांची समजूत असते, पण ती चुकीची आहे. सनस्क्रीन हे उन्हाळ्या प्रमाणे, हिवाळा किंवा पावसाळयामध्येही तितकेच गरजेचे आहे. सनस्क्रीन केवळ उन्हापासूनच नाही, तर धूळ आणि प्रदूषणापासूनही त्वचेचा बचाव करीत असते. सनस्क्रीन लावताना केवळ चेहऱ्यावर न लावता, मानेवर, गळ्यावर तसेच त्वचेचा जो भाग कपड्याने झाकलेला नाही, त्यावर लावणे आवश्यक आहे.

कॉफीचे अतिसेवनही त्वचेला अपायकारक ठरू शकते. कॉफीच्या अतिसेवनाने डीहायड्रेशन होऊन त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात. त्यामुळे कॉफीचे सेवन मर्यादेमधेच करावयास हवे, त्वचेवरील मृत पेशी हटविण्यासाठी, त्वचा ‘एक्सफोलीयेट’ करणे आवश्यक असते. त्यामुळे त्वचेवरील मृत पेशी हटविल्या जाऊन त्वचा चमकदार बनते. पण जर ‘एक्सफोलीयेशन’ जास्त प्रमाणात केले गेले तर त्वचेला मुलायम ठेवणारी आर्द्रता आणि ऑईल्स त्वचेमधून निघून जाऊन त्वचा निस्तेज आणि कोरडी बनी लागते. त्यामुळे जरी एक्सफोलीयेशन करायचे झालेतरी ते वारंवार करण्याची सवय टाळायला हवी. त्याचप्रमाणे एक्सफोलीयेशन करण्याकरिता शक्यतो नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा.

त्वचेची निगा राखताना शक्यतो नैसर्गिक आणि साधे पदार्थ वापरावेत. तसेच वारंवार निरनिराळ्या ब्युटी ट्रीटमेंट त्वचेवर करून घेणे टाळायला हवे. त्वचेची निगा राखण्यासाठी जे उपाय अवलंबिले जातील, त्याने जर त्वचेला फायदा होत असेल तर तेच स्कीन केअर रुटीन कायम ठेवावे. वारंवार प्रसाधने बदलणे, किंवा त्वचेवर नित्य नवी क्रीम्स वापरून पाहण्याचा मोह टाळायला हवा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment