कर्करोग हे अशी व्याधी आहे, जिचे निदान वेळेत झाले, तर त्यावर उपचार करून त्यापासून मुक्त होणे शक्य होते. पण अनेकदा या रोगाचे निदान वेळेत न झाल्यामुळे योग्य ते उपचार करण्यासाठी पुरेसा अवधी उरत नाही, आणि म्हणून हा रोग प्राणघातक ठरू शकतो. अनेकदा कर्करोगाची लक्षणे ओळखता न आल्याने रुग्ण डॉक्टरांकडे न जाता, लक्षणांकडे दुर्लक्ष करतो, किंवा स्वतःच्या मनाने औषधोपचार करू लागतो. असे करणे ही अपायकारक ठरते. त्यामुळे व्याधीची लक्षणे ओळखता आली नाहीत तरी नेहमीपेक्षा काही तरी वेगळे बदल शरीरामध्ये होत आहेत हे लक्षात येताच त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
कर्करोग शरीराच्या कोणत्याही अवयवाला ग्रासू शकतो. ओठांचा कर्करोग ही देखील गंभीर व्याधी असून, याची काही निश्चित लक्षणे दिसून येतात. ओठांच्या कर्करोगाने ग्रासलेल्या व्यक्तीला काही ही खाताना-पिताना अतिशय त्रास सहन करावा लागतो. तसेच या कर्करोगामुळे ओठांवर जखमा होऊ लागतात. ओठ मुळातच नाजूक असल्याने या कर्करोगावर उपचार करणे तसे कठीणच असते. ओठांवर जखमा होऊन त्यांतून सतत रक्तस्राव सुरु होतो. अनेकदा तर या जखमा तोंडाच्या आतपर्यंत पसरतात. ओठांचा कर्करोग बहुतेक वेळी खालच्या ओठावर पाहायला मिळतो.
ओठांचा कर्करोग असलेल्या व्यक्तीच्या ओठांवर जखमा दिसून येतातच, त्याशिवाय त्या व्यक्तीचे दात ढिले होऊन हलू लागतात. ओठ सतत सुजलेले राहून, त्यांच्यामध्ये वेदना होऊ लागतात. ओठांच्या आसपासच्या कोपऱ्यांमध्ये चिरा पडून त्यातूनही रक्तस्राव सुरु होतो. ओठांवर पांढऱ्या किंवा लाल रंगाचे चट्टे दिसून येतात. तसेच ओठांबरोबर गळा आणि तोंडामध्येही सतत वेदना होतात. अश्या व्यक्तींचा आवाजही बदलतो. ओठांचा कर्करोग होण्यामागे मुख्य कारण तंबाखू आणि गुटख्याचे सेवन, हे आहे. जास्त वेळ कडक उन्हामध्ये राहिल्याने, व धुम्रपान करण्याच्या सवयीमुळेही ओठांचा कर्करोग होण्याचा धोका संभवतो.
अनेकदा ओठांवर जखमा दिसून येऊन त्यातून रक्तस्राव होत असूनही उष्णता झाली असेल, किंवा तोंड आले असेल अशी समजूत करून घेऊन स्वतःच्या मनाने औषधोपचार न करता ही लक्षणे जर आठवड्याभरापेक्षा जास्त काळ टिकून राहिली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अगत्याचे ठरते.
ही लक्षणे ओठांच्या कर्करोगाची
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही