मुंबई: शिवसेनेकडून गुजराती समाजासाठी ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ म्हणत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा अंधेरी-ओशिवरा येथील गुजरात भवनातील नवनीत हॉलमध्ये होणार आहे. 100 गुजराती व्यापारी या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. ११ गुजराती उद्योगपती शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांच्या उपस्थितीत यावेळी शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत.
गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी शिवसेनेचा मेळावा
राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक या सगळ्यात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. शिवसेनेचा मुंबई महानगरपालिका हा बालेकिल्ला मानला जात असल्यामुळे शिवसेनेने यावेळी मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
भाजपकडून निर्माण झालेल्या तगड्या आव्हानामुळे आता शिवसेना मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कामाला लागली आहे. शिवसेनेने फक्त मराठी मतदारांवर अवलंबून न राहता मुंबईच्या कॉस्मोपॉलिटीन मतदारांना त्यासाठी साद घालायचे ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून आता शिवसेनेकडून मुंबईसह राज्यातील गुजरात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
शिवसेनेचा पायाखालचा मतदारवर्ग दिवसेंदिवस घसरत चालल्याने कृत्रिम वलय तयार केले जात असून शिवसेनेने आत्मविश्वास गमावला, म्हणून त्यांना खमंग ढोकळा आठवला, अशी खरमरीत टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. तर जिलबी अने फाफडा, जनाब सेनेला द्या झापडा, अशी भूमिका गुजराती मुंबईकरांनी आता घेतली असल्याची खरमरीत टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर केली आहे.
शिवसेनेच्या भूमिकेवर मी काय सांगू शकतो. महाविकास आघाडी मजबूत व्हावी, असे मला वाटते. कालांतराने भूमिका बदलतात. अनुभवाने माणूस शिकतो. शिवसेनाचा हा बदल स्वागतार्ह असल्याची अशोक चव्हाण यांनी दिली आहे.