विदेशी पोपटांना वाढती मागणी


कित्येक शतके पाळीव म्हणून पाळला जाणारा पोपट आजकाल खूपच मागणी असणारा पक्षी झाला असून उत्तराखंड राज्यात विदेशी पोपटांना खूपच मागणी असल्याचे समजते. ग्रामीण तसेच शहरी भागातून त्यांना मागणी असून त्यांच्या किंमतीही १० हजार रुपयापासून ८ लाख रुपयापर्यंत आहेत.

भारतात अनेक घरात पोपट पाळला जातो. गोड बोलणारा हा पक्षी पाळला जात असल्याचे प्राचीन काळापासून संदर्भ मिळतात. आपल्या अनेक कथा, गाण्यातून पोपटाचे उल्लेख येतात. भारतीय पोपट हिरवागार आणि लाल चोचीचा असतो तर विदेशी पोपट अनेक रंगाचे असतात. बंगलोर, चेन्नई आणि कोलकाता येथे पोपटांचे बाजार भरतात.


भारतीय पक्ष्यांसाठी खरेदी विक्री करताना इंडिअन वाइल्ड लाईफ कायदा १९७२ लागू आहे मात्र विदेशी पक्ष्यांसाठी हा कायदा लागू नाही. आफ्रिकन ग्रे हा सर्वाधिक मागणी असलेल्या पोपट राखी रंगाचा आणि लाल शेपटीचा असतो. हा सर्वाधिक बोलणारा पोपट असून त्याला ४० ते ५० हजार रु. किंमत मिळते. अमेरिकन मकाऊच्या अनेक प्रजाती असून त्याची स्कार्लेट हि जात महाग आहे. या जातीच्या पोपटाची किंमत ६ लाखापर्यंत आहे. ब्लू एंडगोल्ड,ग्रीन विंग अश्या त्याच्या अन्य जाती आहेत. हॉलंडची बजरी, द. आफ्रिकेचा लवबर्ड, ऑस्ट्रेलियाचे काकातुआ, बजारिका, रोजेन हे पोपट विशेष लोकप्रिय आहेत.


पोपटांच्या जगभरात ३५० हून अधिक प्रजाती आहेत. त्यांचे आयुष्य माणसाप्रमाणे १० ते ७५ वर्षे असते. पोपटाचा आवाज १ किमी पर्यंत ऐकू जातो. धान्य, फळे असा त्यांचा आहार असतो.

Leave a Comment