आता अस्तित्वात नसलेले भयंकर, विशालकाय वन्यजीव


शास्त्रज्ञ आणि पुरातत्वविशेषज्ञ जेव्हा अनेक ठिकाणी उत्खनन करून तेथे सापडलेल्या अवशेषांचे अवलोकन करतात, त्यांचा अभ्यास करतात, तेव्हा आता अस्तित्वात नसलेले पण एके काळी धरातलावर मनमुक्त संचार करणारे जीव नेमके कसे असावेत याचा अंदाज त्यांना बांधता येतो. प्राचीन काळी अस्तित्वात असणारे हे जीव कसे असावेत याचा अंदाज घेताना हे लक्षात येते, एके काळी पृथ्वीवर असणारे हे विशालकाय प्राणी, पक्षी, आणि विशालकाय जलचर इतर वन्यजीवांसाठी अतिशय धोकादायक होते.

टायटनोबोआ नामक सर्प केवळ एक विशालकाय सर्पच नव्हे, तर एके काळी पृथ्वीवर अस्तित्वात असणारा सर्वात विशालकाय सर्प होता. या सर्पाची लांबी चाळीस फुटांपेक्षाही जास्त असून, तर याचे वजन तब्बल २५०० पाउंड्स असे. टायटनोबोआ हा सर्प विषारी नसून, आपली शिकार तो गिळंकृत करीत असे. हा सर्प आपल्या शिकारीला अतिशय ताकदीने आवळत असे. जलचर हे या सर्पाचे मुख्य खाणे असे. डायनोसॉर अस्तंगत झाल्यानंतर काही काळाने हे सर्प ही अस्तंगत झाले. पल्मोनोस्कॉरपियन नामक आठ पाय असलेल्या भला मोठा विंचू प्राचीन काळी अस्तित्वात होता. सुमारे ३०० मिलियन वर्षांपूर्वी हा विंचू पृथ्वीवर अस्तित्वात होता. या विंचवाची लांबी तब्बल एक मीटर इतकी असून, याच्या शरीरामध्ये असलेल्या एका विशिष्ट प्रथिनामुळे हा विंचू जांभळ्या रंगाचा दिसत असे. बेडूक आणि तत्सम लहान जीव हे या विंचवाचे मुख्य भोजन होते.

मेगापिरान्हा नामक जलचर प्राचीन काळी अस्तित्वात होते. यांचे अवशेष सर्वप्रथम दक्षिण अमेरिकेमध्ये १९८० साली सापडले होते. ‘सार्कोसुखस’ किंवा ‘सुपरक्रॉक’ या नावाने ओळखला जाणारा जलचर मगरीप्रमाणे दिसणारा होता. या मगरीची लांबी अकरा ते बारा मीटर असून, याची उंची २ मीटर पेक्षाही अधिक असे. याचे अवशेष सर्वप्रथम १९६४ साली सापडले होते. या अवशेषांवरून हा जलचर किती विशालकाय आणि भयानक असावा याचा अंदाज शास्त्रज्ञांना बांधता येणे शक्य झाले. या अवाढव्य मगरीचे वजन तब्बल आठ टन असावे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. सापडलेल्या अवशेषांवरून या जलचराचे आयुष्य साधारण चाळीस वर्षांचे असून, त्याची वाढ पूर्ण झाली नसल्याचा शास्त्रज्ञांचा कयास आहे.

मोसासोरस हे विशालकाय पालीप्रमाणे दिसणारे जलचर होते. हे जलचर ७० मिलियन वर्षांपूर्वी अस्तित्वात असून, नेदरलंडस् मधील एका दगडाच्या खाणीमध्ये १७६४ साली याचे अवशेष सापडले होते, यानंतर याच खाणीमध्ये आणखी एका मेसोसोरसचे अवशेष २०१२ साली सापडले. मेगालोडननामक जलचर अनेक मिलियन वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तिवात असून, सध्या अस्तिवात असलेल्या ग्रेट व्हाईट शार्क पेक्षा हा जलचर किती तरी मोठा होता. हा जलचर साठ ते सत्तर फुट लांबीचा असून, याचे वजन तब्बल साठ टनांच्या आसपास असे. या जलचराच्या प्रत्येक दाताची लांबी पाच इंच असे. या जलचराचा रोजचा आहार एक टन वजन भरेल इतका असे. समुद्रामध्ये असणारे व्हेल मासे हे या जलचरांचे प्रमुख खाद्य होते.

Leave a Comment