का बरे महाग असते ‘रोलेक्स’चे घड्याळ ?


सर्व जगभरामध्ये रोलेक्सची घड्याळे अतिशय महाग ब्रँड म्हणून प्रसिद्ध आहेत. हे घड्याळ हातावर असणे, हे ‘स्टेट्स सिम्बॉल’ समजले जाते. खरेतर सर्वसाधारण घड्याळासारखे दिसणारे हे घड्याळ, पण तरीही ते विकत घेण्यासाठी लाखो रुपये का मोजावे लागत असतील बरे? या घड्याळाच्या खासियती जाणून घेऊ या.

रोलेक्सची घड्याळे ही अतिशय कौशल्याने तयार केली जाणारी घड्याळे आहेत. हे घड्याळे तयार करताना अनेक विशिष्ट तंत्रज्ञानांचा वापर केला जात असल्यामुळे या ब्रँडच्या प्रत्येक घड्याळाची किंमत लाखो रुपयांची असते. या घड्याळांच्या निर्मितीकरिता रोलेक्स कंपनीने खास रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरीची निर्मिती केली आहे. या प्रयोगशाळेमध्ये प्रत्येक घड्याळ तयार करताना अतिशय बारकाईने त्यावर काम केले जाते. या प्रयोगशाळेमध्ये अद्ययावत यंत्रणा वापरली जात असून, येथे काम करणारे कारागीर अतिशय उत्तमरित्या प्रशिक्षित केले जातात. हे कारागीर हर एक घड्याळ अतिशय बारकाईने डिझाईन करतात.

रोलेक्सही कंपनी मेकॅनिकल घड्याळे तयार करते. त्यामुळे प्रत्येक घड्याळामध्ये यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. ही घड्याळे तयार करण्याचे काम मोठे जिकीरीचे आहे. आणि म्हणूनच या घड्याळांची किंमत बाजारामध्ये लाखो रुपयांची आहे. रोलेक्सचे सर्वात पहिले घड्याळ १९५३ साली तयार केले गेले. तेव्हा तयार केले गेलेले ‘सबमरीनर’ घड्याळ हे तरणपटू आणि डायव्हर्स करिता खास तयार करण्यात आले होते. रोलेक्सच्या प्रत्येक घड्याळामध्ये इतके अनेक सूक्ष्म पार्टस् जोडलेले असतात, की त्यांची मोजदाद करणे कठीण व्हावे. हे पार्टस् या घड्याळामध्ये फिट करणे हे कौशल्याचे काम आहे. प्रत्येक पार्ट फिट करताना तो खराब होऊ नये याची काळजी घेत काम करावे लागते. तसेच एकदा घड्याळ संपूर्णपणे ‘असेंबल’ झाले, की याचे पॉलिशिंग मशीनद्वारे न करता, कारागीर स्वतःच्या हातांनी ते करतात.

हे घड्याळ तयार करण्यासाठी वापरले जाणारे मटेरियल अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असल्यानेही या घड्याळाची किमंत वाढते. हे घड्याळ तयार करताना ९४० एल स्टीलचा वापर केला जातो. या घड्याळाची डायल व्हाईट गोल्डची बनविली जाते, व घड्याळातील आकडे आणि काटे प्लॅटीनमने तयार केले जातात. या घड्याळांची निर्मिती अतिशय मर्यादित प्रमाणात केली जाते. ही घड्याळे बनविण्याकरिता सोने, चांदी या धातूंचाही उपयोग केला जातो. ही घड्याळे स्वित्झर्लंडमध्ये तयार केली जात असून दरवर्षी आठ ते दहा लाख घड्याळांची निर्मिती केली जाते.

Leave a Comment