घरातील विजेच्या गरजेसाठी सोलर पॅनलचा ‘इको फ्रेंडली’ पर्याय


घरामध्ये दररोजची वीज वापराची गरज पूर्ण करण्याकरिता सोलर पॅनल्सद्वारे सौर उर्जेचा वापर करण्याचा ‘इको फ्रेंडली’ पर्याय आता लोकप्रिय होऊ लागला आहे. सौर उर्जेचा वापर करून घेण्याचे फायदे जसजसे लोकांच्या लक्षात येत आहेत, तसतसे सौर उर्जेचा वापर जास्तीत जास्त करून घेण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. एक तर इतर विद्युत उपकरणांच्या प्रमाणे सोलर पॅनल्सना जास्त देखभालीची आवश्यकता नाही. एकदा सोलर पॅनल्स लावून घेतली, की साधारणपणे पंचवीस वर्षे ही व्यवस्थित कार्यरत राहतात. विजेचा कमीत कमी वापर करीत आपल्या दैनंदिन गरजा सौर उर्जेच्या मदतीने पूर्ण करीत असताना, आणखीही लोकांना हा पर्याय अवलंबण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या करिता प्रशासनातर्फे ही मदत केली जात आहे.

विजेची वाढती मागणी आणि त्या मानाने कमी होणारे विजेचे उत्पादन, यांचे गणित जुळविण्यासाठी सौर उर्जेच्या वापराचा पर्याय मोठा कामाचा ठरला आहे. पण आजही अनेक लोक असे आहेत, ज्यांना या बद्दल विशेष माहिती नाही. त्यामुळेच प्रशासनाच्या वतीनेही या बाबतीत सातत्याने जनजागृती केली जात असते. सोलर पॅनल हे एक असे उपकरण आहे, जे सौर उर्जा अवशोषित करून त्याचे रुपांतर विजेमध्ये करते. या पॅनल्स मध्ये लावले गेलेले अनेक ‘फोटोव्होल्टीक सेल्स’ सौर उर्जा विजेमध्ये रुपांतरीत करीत असतात. हे सेल ‘ग्रिड’ पॅटर्नमध्ये पॅनलवर लावले जातात. ही पॅनल्स ‘क्रिस्टलाईन सिलिकॉन सोलर सेल्स’ ने बनविलेली असतात. या पॅनल्सच्या वापराने विजेच्या बिलामध्ये कपात होतेच, तसेच ही पॅनल्स वर्षानुवर्षे चालतात.

ही पॅनल बॅटरीवर चालत असून, दहा वर्षांतून एकदा ही बॅटरी बदलण्याची गरज पडते. एक किलोवॅट विजेचे निर्माण करण्याची क्षमता असणारे पॅनल, एका घराची विजेची गरज सहज भागवू शकते. जर घरांमध्ये एसीचा वापर होत असेल, तर दोन किलोवॅट उर्जा निर्मिती करणाऱ्या पॅनल्सचा वापर करणे अधिक योग्य ठरते. विदेशी कंपन्यांनी तयार केलेल्या सोलर पॅनल्सच्या मानाने भारतीय कंपन्यांनी बनविलेली पॅनल्स, कमी खर्चिक, पण तितकीच उत्तम प्रतीची आहेत.

ही पॅनल्स घरावर लावायची झाल्यास त्यासाठी सुमारे एक लाख रुपयांचा खर्च येतो, तसेच यासाठी राज्य सरकारच्या ‘रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट अथॉरीटी’ शी संपर्क साधला जाऊ शकतो. सोलर पॅनल्स लाववून घेण्याकरिता कर्ज आणि सबसिडीचे फॉर्म्सही उपलब्ध आहेत. राज्य सरकारप्रमाणे खासगी डीलर्स कडूनही सोलर पॅनल्स लाववून घेता येऊ शकतात.

Leave a Comment