किडनीशी निगडित आजार उद्भविल्यास त्याची लक्षणे अशी ओळखा


आपल्या शरीरातील किडनी हा अवयव शरीरातील अतिमहत्वाच्या अवयावांपैकी एक आहे. शरीराचे सर्व कार्य सुरळीत चालावे या करिता कीडनी निरोगी असणे आवश्यक असते. या अवयावामुळे शरीरातील विषारी द्रव्ये आणि घातक पदार्थ शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास, लाल रक्तकोशिकांच्या निर्मितीमध्ये आणि शरीरातील सर्व अवयव, हाडे मजबूत ठेवण्यास किडनी सहायक आहे.

पण धक्कादायक वास्तव हे आहे, की भारतातील एकूण जनसंख्येपैकी एकूण १७.२% जनता किडनीशी निगडित विकारांनी ग्रस्त आहे, ही बाब ‘स्क्रीनिंग अँड अर्ली इव्हॅल्युएशन ऑफ किडनी डिसीज’ द्वारे केल्या गेलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. मात्र वैद्यकीय सल्ल्याच्या आधाराने किडनीशी निगडित विकारांचे निदान वेळेवर होऊ शकते, आणि त्यामुळे पुढील उपाययोजना, औषधोपचारही वेळेवर होऊ शकतात. किडनीशी निगडित विकार उद्भविला असता, शरीरामध्ये काही ठराविक लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे दिसून आल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष न करता, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

जर किडनी सुरळीत काम करीत नसल्या, तर शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण वाढू लागते. किडनी आपले काम व्यवस्थित करू शकत नसल्याने शरीरातील पाणी बाहेर टाकले जात नाही, हे पाणी शरीरामध्ये साठू लागते. यालाच फ्लुइड रीटेन्शन असे ही म्हटले जाते. पायांवर असणारी हलकी सूज फ्लुइड रीटेन्शनची सूचक असू शकते. ही सूज टाचांवरही प्रामुख्याने दिसून येते. तसेच किडनी व्यवस्थित काम करण्यास सक्षम राहिल्या नसतील तर शरीरातील घातक पदार्थ बाहेर टाकण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ लागतात. जर हे घातक पदार्थ शरीरामध्ये साठत गेले, तर त्यातून निरनिराळ्या व्याधी उत्पन्न होण्याचा धोका संभवतो. सतत शारीरिक थकवा, अशक्तपणा, आणि कोणत्याही कामामध्ये मन एकाग्र न होऊ शकणे ही लक्षणे किडनीच्या विकाराची सूचक असू शकतात.

जर किडनी तंदुरुस्त असतील, तर शरीरातून बाहेर पडणाऱ्या मलातून किंवा लघवीतून रक्तकोशिका फिल्टर करून शरीरामध्ये परत पाठवण्याचे काम त्या करीत असतात. मात्र किडनीच्या विकारामध्ये लघवीमध्ये रक्तकोशिका दिसून येऊ शकतात, कारण त्या अवस्थेमध्ये किडनी फिल्टरेशनचे काम व्यवस्थित करू शकत नाहीत. तसेच किडनी सुरळीत काम करू शकत नसल्यामुळे शरीरातील पोषक तत्वे आणि क्षारांचे संतुलनही बिघडते, त्यामुळे सतत अंगाला खाज सुटणे, वाचा कोरडी पडू लागणे ही लक्षणे दिसून येऊ शकतात. या सर्व लक्षणांच्या सोबतच वारंवार लघवीची भावना ही होऊ लागते, व लघवीमध्ये जास्त फेस दिसून येतो.किडनीमधून प्रथिने जास्त प्रमाणात बाहेर दिली जाऊ लागल्यास डोळ्यांच्या भोवती सतत सूज दिसून येते. हे लक्षण बऱ्याच आजारांच्या बाबतीत दिसून येत असल्यामुळे या बाबतीत, किंवा इतरही कोणती लक्षणे जाणाविल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment