मोदींविरोधात ट्विट केल्याप्रकरणी पायलटला ‘गोएअर’ने तडकाफडकी कामावरून काढले


नवी दिल्ली – गोएअर या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी तात्काळ पायलटला कामावरून काढून टाकले. अवमानकारक विधान पंतप्रधानांविषयी केल्याप्रकरणी पायलटला तात्काळ कामावरून निलंबित केल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

गोएअरने कामावरून काढून टाकलेल्या पायलटचे मिकी मलिक असे नाव आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर ट्विट करून मिकी मलिक यांनी टीका केली होती. कंपनीने मलिकच्या ट्विटवर आक्षेप घेत ही कारवाई केली. पंतप्रधान मुर्ख असून मलाही तुम्ही मुर्ख म्हणू शकता. मला वाईट वाटणार नाही. कारण की, मी पंतप्रधान नाही. पण पंतप्रधान मुर्ख असल्याची टीका मलिक यांनी ट्विटमधून केली होती.

अनेकांनी मलिक यांच्या ट्विटवर आक्षेप घेत संताप व्यक्त केला. मलिक यांनी ते ट्विट वाद निर्माण झाल्याने डिलीट करुन माफीही मागितली. तसेच ट्विटर अकाऊंट लॉकही केले. मी पंतप्रधानांबद्दल आणि इतर काही आक्षेपार्ह ट्विटबद्दल माफी मागतो. जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगीरी व्यक्त करतो. ट्विटमधून व्यक्त करण्यात आलेली मते वैयक्तिक होती. त्यांच्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या गोएअरचा कोणताही संबंध नसल्याचे सांगत मलिक यांनी माफीही मागितली आहे.

दरम्यान, मलिक यांना या प्रकरणी गोएअरने तडकाफडकी कामावरून कमी केले आहे. अशा प्रकरणात गोएअरची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे आणि ती कंपनीशी संबंधित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बंधनकारण आहे. गोएअरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या नियमांचे, कायद्यांचे आणि सोशल मीडिया संबंधित धोरणांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे गोएअरच्या प्रवक्त्यांनी या कारवाईबद्दल बोलताना सांगितले.