इजिप्त येथे असलेले ‘ग्रेट पिरामिड ऑफ गीझा’ हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. अश्या प्रकारची पिरामिड्स जगामध्ये इतर अनेक ठिकाणी असली, तरी इजिप्त येथील पिरामिड्स सर्वात प्राचीन म्हणून ओळखली जातात. ही रहस्यमयी पिरामिड्स नेहमीच वास्तू विशारदांच्या, पुरातत्ववेत्त्यांच्या आणि पर्यटकांसाठी आकर्षण आणि कुतूहलाचा विषय ठरत आली आहेत. आजवर इजिप्त मध्ये एकूण १३८ लहान मोठी पिरामिड्स सापडली आहेत. यामध्ये गीझा येथील तीन पिरामिड्स सर्वात मोठी आणि सर्वात प्रसिद्ध ही आहेत.
गीझा येथील तीन पिरामिड्स पैकी ‘ग्रेट पिरामिड ऑफ गीझा’ हे सर्वात मोठे पिरामिड असून, यालाच ‘पिरामिड ऑफ खोफू’ किंवा ‘पिरामिड ऑफ चेओप्स’ असे ही म्हटले जाते. आजच्या आधुनिक युगामध्येही उभे असलेले हे पिरामिड सर्वात प्राचीनही आहे. इजिप्तमधील बहुतेक सर्व पिरामिड्स, इजिप्तचे राजे, म्हणजेच सर्व ‘फॅरो’ आणि त्यांच्या परिवारजनांची समाधीस्थळे म्हणून बांधली गेली. सर्वात प्राचीन म्हणून ओळखले जाणारे आणखी एक पिरामिड म्हणजे ‘पिरामिड ऑफ द्जोसर’ हे पिरामिड साक्कारामध्ये ख्रिस्तपूर्व २६३०-२६११ या काळादरम्यान बांधले गेले. इजिप्तची प्राचीनकालीन राजधानी मेंफीसची दफनभूमी साक्कारा येथे होती.
गीझा पिरामिड्सच्या आसपास गीझाचे ‘स्फिंक्स’ही आहेत. या मूर्ती देखील अतिप्राचीन असून, या मूर्तीचा चेहरा इजिप्तचे राजे फॅरो खाफ्रे यांच्या चेहऱ्याशी मिळता जुळता आहे. बहुतेक सर्वच पिरामिड्स नाईल नदीच्या पश्चिमी तीरावर बांधण्यात आले होते. सूर्याच्या मावळतीची म्हणजेच पश्चिम दिशा इजिप्तच्या पौराणिक कथांमध्ये मृत व्यक्तींसाठी मानली गेली आहे. इजिप्तचे फॅरो, किंवा त्यांच्या परिवारातील कोणाचा मृत्यू झाल्यास त्या मृत व्यक्तीसोबत, त्यांच्या रोजच्या वापरातील वस्तू, आभूषणे देखील दफन केली जात असत. मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये त्या व्यक्तींना या सर्व वस्तू उपयोगी पडतील अश्या समजुतीने या सर्व वस्तू मृत व्यक्तीच्या सोबत दफन केल्या जात असत. मृत व्यक्तीच्या शरीरावर दफन करण्यापूर्वी अनेक रासायनिक प्रक्रिया केल्या जात (ममीफिकेशन).
इमोतेप हा पिरामिडचा प्रथम निर्माणकर्ता समाजला जातो. इमोतेप हा इजिप्शियन गणितज्ञ, स्थापत्यविशारद, चिकित्सक आणि इजिप्शियन चान्सलर होता. पिरामिड कशा प्रकारे तयार केले जावे, त्याचे डिझाईन कसे असावे, याचे संपूर्ण आराखडे इमोतेपने तयार करविले होते. हे पिरामिड्स पॉलिश केलेल्या लाईमस्टोनने बनविले गेले असल्याने सूर्याच्या प्रकाशामध्ये हे पिरामिड्स एखाद्या रत्नाप्रमाणे चमकत असत. ह्या पिरामिड्सचे निर्माण अश्या रीतीने केले गेले होते, की बाहेर तापमान कितीही असले, तरी आतील तापमान नेहमी वीस अंशांचे राहत असे. गीझा पिरामिडच्या आतील तापमान तीस अंशांच्या आसपास असते. गीझाचे ग्रेट पिरामिड तयार करण्यासाठी तब्बल दहा दिवसांचा अवधी लागला.