रोज मुठभर दाण्याच्या खुराक देईल उत्तम आरोग्य


भारतीय घराघरात हमखास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे शेंगदाणे. उपवासाला त्याचा वापर अधिक होतो. शेंगादाण्याला स्वस्त बदाम असेही म्हटले जाते. कच्चे, भाजून, उकडून, विविध पदार्थात वापर करून, तेल स्वरुपात तसेच शेंगदाणे लोणी स्वरुपात आपल्याकडे खाल्ले जातात. शेंगदाणे रोजच्या आहारात सामील असतील तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. बदामात असणारी सर्व पोषक तत्वे यात आहेत शिवाय ते बदमापेक्षा स्वस्त असतात आणि त्यामुळे सर्व आर्थिक स्तरातील लोकांना सहज परवडू शकतात.

शेंगदाणे हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहेत. १०० ग्राम शेंगदाण्यातून १ लिटर दुधातून जेवढी प्रथिने मिळतात तितकीच मिळतात. शेंगदाणे भाजून खाता येतात. त्यातून २५० ग्राम मांसातून जेवढे मिनरल्स मिळतात तितके मिळविता येतात. आयुर्वेदात शेंग तेलाचा वापर अनेक औषधे बनविण्यासाठी केला जातो.


शेंगदाण्याचे तेल रोजच्या स्वयंपाकात वापरले जाते. हे तेल अंगाला लावले तर त्वचेवरील जंतू नाश पावतात. शेंगदाणे तेल सेवनामुळे हाडे मजबूत होतात. शरीराला आवश्यक कॅल्शियम आणि डी जीवनसत्व शेंगादाण्यातून मिळविता येते. यात फोलिक अॅसिड आहे ज्यामुळे महिलांना गर्भावस्थेत फायदा होतो तसेच त्यांची प्रजोत्पादन क्षमता अधिक वाढण्यास मदत मिळते.


शरीराची विविध कामे सुरळीत चालण्यासाठी हार्मोन म्हणजे संप्रेरके यांचे संतुलन असावे लागते. हे संतुलन राखण्यास शेंगदाणे खाणे फायद्याचे ठरते. यात पॉलीफीनॉलिक अँटीऑक्सिडन्ट आहे यामुळे पोटाच्या कॅन्सर पासून बचाव होऊ शकतो. शेंगदाण्यापासून बनविले जाणारे लोणी आठवड्यातून एकदा दोन चमचे खाल्ले त्यासाठी उपयुक्त ठरते. आठवड्यातून पाच दिवस शेंगदाणे खाल्ले तर हृदय रोगापासून संरक्षण मिळते आणि कोलॅस्टरॉल नियंत्रित राहते.

Leave a Comment