स्वयंपाकघरातील या वस्तू सतत निर्जंतुक करीत राहणे आवश्यक


आपल्या घराची साफ सफाई आपण दररोज करीत असलो, तरी आपल्या घरामध्ये अशा अनेक लहानमोठ्या रोजच्या वापरातील वस्तू असतात, ज्यांना सातत्याने निर्जंतुक करणे आवश्यक असते. जर या वस्तू निर्जंतुक केल्या गेल्या नाहीत, तर त्यामध्ये किटाणूंचा प्रादुर्भाव होऊन, त्या किटाणूंच्या द्वारे आपल्याला इन्फेक्शन्स होण्याचा धोकाही उद्भवू शकतो.

वस्तू निर्जंतुक करण्याची सुरुवात स्वयंपाकघरापासून करायला हवी. स्वयंपाकघरामध्ये ओटा पुसण्यासाठी वापरण्यात येणारा टॉवेल, किंवा कापडावर किटाणूंचा प्रादुर्भाव सर्वाधिक असतो. स्वयंपाक करीत असताना ओट्यावर सांडलेले पदार्थ पुसून काढण्यासाठी या कपड्याचा वापर सतत होत असतो. अन्नाचे कण या कपड्याला चिकटून राहतात, त्यामुळे हा कपडा थोड्याच वेळात काहीसा ओशट होतो, आणि त्यावर किटाणूंचा प्रादुर्भाव सुरु होतो. हा कपडा निर्जंतुक न करता वारंवार वापरला गेला, तर त्यावरील किटाणूंचा संसर्ग अन्यत्र होण्याचाही धोका असतोच. म्हणून हा कपडा व्यवस्थित धुणे आवश्यक आहे. दररोज हा कपडा बदलून, त्याजागी दुसरा कपडा वापरावा. खराब झालेला कपडा गरम पाणी आणि साबणामध्ये थोडा वेळ भिजत ठेऊन त्यानंतर स्वच्छ धुवावा, व कडक उन्हामध्ये वाळवावा. ओटा पुसण्याच्या कपड्या प्रमाणेच भांडी पुसण्याचे किंवा हात पुसण्याचे नॅपकिनही वेळोवेळी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवावेत.

स्वयंपाकघरातील आणखी एक वस्तू, जिच्यावर किटाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो, ती म्हणजे भांडी घासण्याचा स्पंज, किंवा घासणी. आजकाल भांडी घासण्यासाठी प्लास्टिकचे स्क्रबर किंवा स्पंज यांचा वापर सर्रास होत असतो. खरकटी भांडी घासताना या भांड्यांवरील अन्नाचे कण या घासणीमध्ये किंवा स्पंज मध्ये अडकून राहतात. त्यामुळे हे स्पंज जर स्वछ धुतले नाही, तर ते अन्नाचे कण त्याला तसेच चिकटून राहून सडू लागतात, आणि त्यातून दुर्गंधी येऊ लागते. याच स्पंजने भांडी साफ करीत राहिले, तर जंतूंचा संसर्ग होऊन इन्फेक्शनचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे भांडी घासण्याचे स्पंज सातत्याने निर्जंतुक करायला हवेत. हा स्पंज साबणाने स्वच्छ धुवून घेऊन दोन मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये ठेवल्यास तो पूर्णपणे निर्जंतुक होण्यास मदत होते. मायक्रोवेव्हचा वापर करायचा नसल्यास, स्पंज, गरम पाणी आणि साबणाने स्वछ धुवून हवेवर संपूर्णपणे वाळू द्यावा. दर दोन ते अडीच महिन्यांनी जुना स्पंज बदलून टाकून, त्याजागी नवा स्पंज वापरावा.

स्वयंपाकघरातील भांडी घासण्याचे बेसिन, किंवा सिंकही स्वच्छ ठेवणे अतिशय आवश्यक असते. सिंक स्वच्छ करण्यासाठी त्यामध्ये थोडा बेकिंग सोडा घालून त्याने बेसिन घासावे. तसेच सिंकच्या ‘ड्रेनहोल’ मध्ये थोडा बेकिंग सोडा घालून त्यावर थोडे व्हिनेगर घालावे आणि त्यावर कडकडीत पाणी ओतावे. यामुळे सिंकचा ड्रेनपाईप स्वछ होतो, व त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा अडकला असल्यास तो ही निघून जाण्यास मदत होते.

Leave a Comment