राज्यात आतापर्यंत ११० लाख क्विंटल कापसाची हमी भावाने खरेदी


मुंबई : राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ आणि भारतीय कापूस महामंडळ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-सीसीआय) यांच्याकडून हमी दराने दि. २७ नोव्हेंबर २०२० पासून कापूस खरेदी प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यत ११० लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून जवळपास ४ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे यांनी दिली.

कापूस खरेदीची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी सुरु असून राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाची ५१ खरेदी केंद्र सुरु असून १५२ जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीज सुरु आहेत. तर सीसीआयची ८८ खरेदी केंद्र सुरु आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर रक्कम अदा करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी केंद्राकडे नोंद करावी, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक उन्हाळे यांनी केले आहे.

मागील वर्षी राज्यात गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी करण्यात आली असून कोविडच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन कालावधीत सुद्धा सर्व उपाययोजना करुन कापूस खरेदी प्रक्रिया सुरु ठेवण्यात आली होती. यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांची एकाचवेळी खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही यादृष्टीने सर्व उपायोजना करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी कापूस खरेदी प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, ग्रेडर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, अशी माहिती उन्हाळे यांनी दिली.