भंडारा अग्नितांडव : मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश; राहुल गांधींकडून मदतीचे आवाहन


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेत सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी माहिती घेण्याबरोबरच घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले.

शनिवारी मध्यरात्री भंडारा जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. दहा नवजात बालकांचा या आगीत मृत्यू झाला. तर सात बालकांना सुखरुप वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दखल घेत आरोग्य राजेश टोपे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्याचबरोबर ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील चर्चा केली असून, त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.


भंडाऱ्यातील या घटनेबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही हळहळ व्यक्त केली. त्याचबरोबर जखमी व मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने सर्वोतोपरी मदत करण्याचे आवाहनही केले आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागल्याची दुर्दैवी घटना वेदनादायी आहे. जीव गमावलेल्या मुलांच्या कुटुंबांबद्दल माझ्या सहवेदना व्यक्त करतो. महाराष्ट्र सरकारने जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदत करावी, असे आवाहन मी करतो, असे ट्विट करून राहुल गांधी यांनी म्हटले आहे.