रॉबर्ट वाड्रा निवडणूक रिंगणात उतरण्यास उत्सुक

कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती ५२ वर्षीय रॉबर्ट वाड्रा यांनी राजकारणात सक्रीय होण्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली असून ते निवडणूक रिंगणात लढून संसदेत खासदार म्हणून जाण्यासाठी उत्सुक आहेत. मनी लाँड्रीग प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांची तपास यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे आणि त्याबद्दल बोलताना रॉबर्ट वाड्रा यांनी ही चौकशी मुद्दाम केली जात आहे, आणि आता त्यांना संसदेत जाणे भाग पडणार असल्याचे सांगितले आहे.

रॉबर्ट वाड्रा म्हणाले, ज्या परिवाराने देशासाठी, नागरिकांसाठी मोठे योगदान दिले आणि देशासाठी जे शहीद झाले अश्या परिवाराशी त्यांचा संबंध आहे. देशाच्या विविध भागात वाड्रा फिरले आहेत, विरोधी शक्तीविरुध्द लढून संसदेत जाण्याची त्यांची इच्छा आहे. अर्थात ही इच्छा त्यांनी पूर्वी सुद्धा व्यक्त केली आहे.

रॉबर्ट वाड्रा म्हणतात, ‘मी राजकारणात नाही त्यामुळेच मला तपास यंत्रणा त्रास देतात. परिवाराचे समर्थन मिळेपर्यंत मी राजकारणात येणार नाही मात्र उचित वेळ आली की या संदर्भात निर्णय घेणार आहे. जेथे मला मते मिळतील असा मतदारसंघ मी निवडेन. उत्तरप्रदेशातील मूरादाबाद येथून मी निवडणूक लढवावी असा प्रस्ताव आला आहे. हे गाव माझे जन्मस्थान आहे.’

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपद सोडले आणि सोनिया हंगामी अध्यक्ष झाल्या तेव्हा कॉंग्रेस मुख्यालयावर होर्डिंग मध्ये रॉबर्ट वाड्रा झळकले आहेत. शिवाय त्यांनी अमेठी आणि रायबरेली येथे निवडणूक प्रचारात सुद्धा सहभाग घेतला आहे.