बायडेन शपथविधीला ट्रम्प उपस्थिती नाही

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन २० जानेवारी रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतील मात्र या शपथविधीला आजी अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प उपस्थित राहणार नसल्याचे समजते. अमेरिकेच्या इतिहासात १५२ वर्षात आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या शपथविधीला अनुपस्थित राहण्याची ही पहिली वेळ आहे. यापूर्वी १८६९ मध्ये अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन यांच्यानंतर ट्रम्प पाहिले अध्यक्ष आहेत जे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या शपथविधीमध्ये सामील होणार नाहीत. स्वतः ट्रम्प यांनीच ही माहिती त्याच्या ट्विटर अकौंटवरून दिली आहे.

यापूर्वीचे प्रत्येक राष्ट्राध्यक्ष त्यांच्या कार्यकाल संपल्यावर नवीन राष्ट्राध्यक्ष शपथविधीमध्ये सहभागी झालेले आहेत. २०१६ मध्ये ट्रम्प यांच्या शपथविधी समारोहात बराक ओबामा सहभागी झाले होते, २००९ मध्ये ओबामा यांच्या शपथविधीत जॉर्ज डब्ल्यू बुश सहभागी झाले होते.

दरम्यान अमेरिकेतील काही खासदार युएस कॅपिटल हिंसेचे ट्रम्प यांनी समर्थन केल्याने त्यांचा कार्यकाल संपण्याअगोदरच ट्रम्प यांना अध्यक्षपदावरून हटविण्याच्या तयारीत असल्याचे सीएनएनने म्हटले आहे. ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालविला जावा असे प्रयत्न सुरु असून त्यामुळे भविष्यात ट्रम्प परत कधीच फेडरल ऑफिस मध्ये परतू शकणार नाहीत. यासाठी अमेरिकेच्या संविधानातील कलम २५ दुरुस्तीचा वापर केला जाईल असेही समजते. अर्थात त्यासाठी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स याना कॅबिनेटचे बहुमत दाखवावे लागेल आणि त्यासाठी मतदान करावे लागेल.