ट्रम्प यांच्याकडील न्युक्लिअर कोड सुरक्षेबाबत चिंता

अमेरिकन प्रतिनिधी सभेच्या स्पीकर आणि ट्रम्प विरोधी नेत्या नॅन्सी पेलेसी यांनी अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या हातात असलेल्या न्युक्लिअर कोड सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून तशी चिठी डेमोक्रॅटिक खासदारांना लिहिली आहे. पेलेसी म्हणतात, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाती असलेल्या न्युक्लिअर कोड संबंधी अमेरिकेच्या सेना प्रमुखांशी चर्चा केली आहे. ट्रम्प याच कोडच्या मदतीने अणु हल्ल्याचा आदेश कधीही देऊ शकतील अशी भीती पेलेसी यांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकन अध्यक्षाला न्युक्लिअर लाँच कोडचा वापर करून सैन्याला जल, थल आणि नभ अश्या कुठूनही कोणत्याही देशावर अणुहल्ला करण्याचा आदेश देण्याचे अधिकार आहेत. आणि एकदा हा आदेश मिळाला तर सेना तो नाकारू शकत नाही. पेलेसी यांना ट्रम्प याच अधिकारांचा वापर करून चीन, इराण किंवा रशियावर अणुहल्ला करण्याचे आदेश देतील अशी भीती आहे.

८ जानेवारी रोजी यासंदर्भात पेलेसी यांनी अमेरिकेच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष मार्क मिले यांच्याशी चर्चा केली आहे. त्यात ट्रम्प यांना न्युक्लिअर कोड पर्यंत पोहोचण्याच्या आधीच जेवढ्या लवकर अध्यक्षपदावरून हटविता येईल त्यासाठी कार्यवाही सुरु होईल अशी आशा व्यक्त केली आहे. ट्रम्प अणुहल्ला आदेश देणार नाहीत याबाबत सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत. पेलेसी म्हणतात आपला देश, आपले देशवासीय आणि लोकशाही यांचे कोणत्याही हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी आपण जे करू शकतो ते लवकर केले पाहिजे.

अमेरिकन प्रथेप्रमाणे नवीन राष्ट्राध्यक्षाचा शपथविधी झाला की त्यांच्याकडे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कडून न्युक्लिअर कोड सोपविले जातात. त्यामुळे २० जानेवारी रोजी हे कोड बायडेन यांच्याकडे दिले जातील. पण तो पर्यंत ट्रम्प न्युक्लिअर कोडचा वापर करू शकतात.