आशिया खंडातील सर्वात उंच जटोली शिवमंदिर

भारत हा प्राचीन संस्कृती आणि सभ्यता असलेला देश आहे. येथे अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिराच्या उदरात काही ना काही रहस्यमय आहे. देशातील देवभूमी अशी ओळख असलेल्या हिमाचल प्रदेशात असंख्य मंदिरे आहेत आणि त्यातील काही खुपच रहस्यमयी आहेत.

हिमाचलच्या सोलन जिल्ह्यात असेच एक शिवमंदिर असून त्याला जटोली शिवमंदिर म्हटले जाते. हे आशियातील सर्वाधिक उंच शिवमंदिर आहे. या मंदिराच्या बांधकामात वापरण्यात आलेल्या दगडातून काही ठिकाणी हाताने आघात केला तर डमरूसारखा आवाज येतो. या मंदिराचे बांधकाम दक्षिणी द्रविडी शैलीत केले गेले असून हे बांधकाम ३९ वर्षे सुरु होते. मंदिराचा कळस १११ फुट उंच असून वर ११ फुट उंच सुवर्णकलश आहे. या मंदिराचे सर्व बांधकाम देशातील आणि विदेशातील भक्तांनी दिलेल्या दानातून केले गेले आहे.

पौराणिक काळातील कथेनुसार स्वतः महादेव या ठिकाणी एक दिवस राहिले होते. १९५० मध्ये स्वामी कृष्णानंद परमहंस बाबा येथे आले आणि त्यांनी येथे तपस्या केली. त्यावेळी या गावात पाण्याचे फार दुर्भिक्ष होते. बाबांनी शंकराची घोर तपस्या करून त्रिशूलाने जमिनीवर प्रहार केला आणि पाण्याचा प्रवाह वाहू लागला असे सांगितले जाते. हे पाणी अतिशय गुणकारी असून त्यामुळे अनेक रोग बरे होतात असा भाविकांचा विश्वास आहे.

स्वामी कृष्णानंद परमहंस बाबांच्या मार्गदर्शनाने आणि देखरेखीखाली या शिवमंदिराचे बांधकाम सुरु झाले होते. १९८३ मध्ये बाबांनी समाधी घेतली मात्र त्यानंतरही मंदिराचे बांधकाम सुरूच राहिले. मंदिर पूर्ण तयार होण्यास ३९ वर्षे लागली. या मंदिरात शिव पार्वतीची मूर्ती आहे तसेच  स्फटिकाचे शिवलिंग सुद्धा आहे. शिवाय अन्य देवी देवतांच्या मूर्ती आहेत. येथे दर रविवारी मेळा भरतो आणि हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी जमतात.