भाजपमध्ये गेलेल्या वसंत गीते, सुनील बागूल यांची शिवसेना वापसी


नाशिक – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज नाशिकमधील भाजपचे वरिष्ठ नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हे दोन्ही नेते हा प्रवेश सोहळा आटोपल्यानंतर मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, असे राऊत यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

राऊत म्हणाले, या दोन्ही नेत्यांवर नाशिक हा पुन्हा एकदा शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला बनवण्याची जबाबदारी असणार आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्यावतीने या दोघांचे मी शिवसेनेच्या परिवारात मनापासून स्वागत करतो. नाशिकमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे मनापासून स्वागत केले आहे. दरम्यान, शोभा मगर, प्रकाश दायमा हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेशी इतर अनेकांनीही संपर्क साधला असून, महापालिकेतील अनेक महत्वाच्या नेत्यांचाही यात समावेश असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

कुठलाही मास्टर प्लान शिवसेनेचा नाही तर आता प्रवाह आणि हवा बदलत असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच कोणत्याही परिस्थितीत नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच असेल असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.