सिडनी – भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ९६ धावा केल्या असून तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात अनुभवी स्टीव्ह स्मिथचे शतक (१३१) आणि मार्नस लाबूशेन (९१) व विल पुकोव्हस्कीची (६२) अर्धशतके यांच्या जोरावर ३३८ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाने या आव्हानाला प्रत्युत्तर देताना सुरूवात चांगली केली होती. पण खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर रोहित शर्मा आणि शुबमन गिल माघारी परतल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने दिवसाचा खेळ संपेपर्यंत खेळपट्टी सांभाळली.
तिसरी कसोटी; ऑस्ट्रेलियाचा डाव ३३८ धावांवर आटोपला, दुसऱ्या दिवसअखेर भारत मजबूत स्थितीत
शुबमन गिलसोबत दौऱ्यावरील आपला पहिलाच सामना खेळणारा रोहित शर्मा मैदानावर आला. ७० धावांची दमदार भागीदारी या दोघांनी केली. दोघेही शांत आणि संयमी खेळ करत होते. पण जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर बचावात्मक फटका खेळताना रोहित झेलबाद झाला. त्याने ७७ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार लगावत २६ धावा केल्या. शुबमन गिलने डाव पुढे नेत कसोटी कारकिर्दीतील आपले पहिले अर्धशतक झळकावले, पण त्यानंतर लगेचच तोही झेलबाद झाला. १०१ चेंडूत ८ चौकारांसह त्याने ५० धावा केल्या.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचे पहिल्या दिवशी डावावर वर्चस्व होते. सलामीवीर पुकोव्हस्की आणि मार्नस लाबूशेन यांनी अर्धशतके ठोकल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र भारतीय गोलंदाजांनी यजमानांना स्वस्तात रोखले. स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन दोघे चांगला खेळ करत होते. पण लाबूशेन ९१ धावांवर बाद झाल्यावर स्मिथने एकट्याने बाजू लावून धरली. लाबूशेननंतरच्या सर्व फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन चाहत्यांची निराशा केली. मॅथ्यू वेड (१३), कॅमेरॉन ग्रीन (०), टीम पेन (१), पॅट कमिन्स (०), नॅथन लायन (०) हे सारे फलंदाज स्वस्तात परतले. मिचेल स्टार्कने फटकेबाजी करत २४ धावा केल्या. जाडेजाने ४, बुमराह व सैनीने २-२ तर मोहम्मद सिराजने १ बळी टिपला.