मार्च महिन्याच्या अखेरीस नाशिकला होणार ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन


औरंगाबाद : नाशिकलाच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी ९४ वे मराठी साहित्य संमेलन होणार असल्याची घोषणा शुक्रवारी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली. मार्च महिन्याच्या अखेरीस हे संमेलन होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार आहेत.

साहित्य महामंडळाच्या स्थळनिवड समितीने यावेळी नाशिक येथील एकाच संख्येला निमंत्रण पाहणीसाठी निवडले आणि त्याला भेट देऊन आवश्यक ती पाहणी केली आणि आपला अहलवाल महामंडळाला दिल्याचे कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले. याचबरोबर, नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचे एक आणि अंमळनेरवरुन एक अशी ९४ व्या साहित्य संमेलनासाठी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठवले होते, यामध्ये दिल्लीत मे महिन्यांत संमेलन घेण्याची मागणी केली होती. पण स्थळनिवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४ व्या साहित्य संमेलनासाठी साहित्य महामंडळाने त्याची निवड केल्याचे कौतिकराव ठाले पाटील म्हणाले.