कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना लसीकरणाची यशस्वी ‘ड्राय रन’ घेतली. ही ‘ड्राय रन’ आज कोळसेवाडी व पाटकर आरोग्य केंद्रात घेण्यात आली. कोरोना लसीकरण कशा प्रकारे यशस्वी करण्यात येईल, याची पूर्व तयारी म्हणून ही ड्राय रन घेण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील कोरोना लसीकरणाची ‘ड्राय रन’ यशस्वी
कर्मचाऱ्यांमधील आत्मविश्वास या ‘ड्राय रन’मुळे लसीकरण वाढणार आहे. लसीकरणाचे २० लाभार्थी तयार करुन त्यांना ‘ड्राय रन’चा मेसेज महापालिकेने पाठविल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी यावेळी दिली. कोरोना लसीकरणाची प्रक्रिया निवडणूक पॅटर्नप्रमाणे राबविली जाणार आहे. प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरिक्षक कक्ष याची रचना लसीकरणासाठी तयार करण्यात आली आहे.
सरकारी व खाजगी डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पोलीस, सुरक्षा रक्षक आणि तिसऱ्या टप्प्यात वयोवृद्ध आणि व्याधीग्रस्त लाभार्थींना लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर टप्प्या टप्प्याने दररोज १०० लाभार्थींचे लसीकरण केले जाणार आहे.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, डॉ. वैशाली काशीकर, डोंबिवलीचे उपायुक्त सुधाकर जगताप, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. समीर सरवणकर आदी आज घेण्यात आलेल्या ‘ड्राय रन’वेळी उपस्थित होते. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. किशोर चव्हाण यांनी ‘ड्राय रन’वेळी नागरी केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच, ‘ड्राय रन’विषयी समाधान व्यक्त केले.