कोरोना लस घेणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री ठरली शिल्पा शिरोडकर


संपूर्ण जग मागील वर्षभरापासून कोरोना संकटाचा सामना करत आहे. पण या लढाईत आता आपण एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहचलो असून आपल्याला कोरोना प्रतिबंधक लस लस मिळाली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या लसीचे काही देशांत लसीकरणही सुरु झाले आहे. लवकरच भारतात देखील लसीकरण मोहिमेला सुरुवात होईल. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने कोरोनाची लस घेतली असून खुद्द शिल्पाने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. शिल्पाने इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर केला आहे. त्यात तिने डाव्या दंडावर लस घेतल्याचे दिसत आहे.


शिल्पाने हा फोटो शेअर करत लिहिले की, लस घेतल्यामुळे आता सुरक्षित वाटत आहे. द न्यू नॉर्मल… 2021 मी तयार आहे. धन्यवाद UAE. एका मीडिया रिपोर्टनुसार, संयुक्त अरब अमिरातमधील 8 टक्के लोकांनी कोरोना लस घेतली आहे. दरम्यान, शिल्पाने शिरोडकरने ‘किशन कन्हैया’, ‘त्रिनेत्र’, ‘हम’, ‘दिल ही तो है’, ‘आँखें’, ‘पहचान’, ‘गोपी किशन’, ‘मृत्युदंड’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. ‘गज गामिनी’ या चित्रपटाद्वारे ती शेवटची प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

दरम्यान, भारतात आज 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 736 जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीची ड्राय रन होणार आहे. यात मुंबईचा देखील समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी 2 जानेवारी रोजी लसीची ड्राय रन पार पडली होती. आता लवकरच लसीकरणालाही सुरुवात होईल, अशी आशा आहे.