डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रामदास आठवलेंची टीका


मुंबई – डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील जनमताचा कौल अमान्य करून रिपब्लिकन संकल्पनेचा; लोकशाहीचा अवमान केला असून ट्रम्प यांनी लोकशाहीत बहुमताचा सन्मान करून जो बायडेन यांना पदाची सूत्रे सोपवणे आवश्यक होते. पण याउलट कृती करून स्वतःची प्रतिमा ट्रम्प यांनी कलंकित करून घेतली असल्याचे म्हणत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत आम्हाला अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून आदर होता, पण अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव त्यांनी मान्य न करता पदाला चिकटून राहण्याची केलेली कृती लोकशाहीविरोधी आणि रिपब्लिकन प्रतिमेला काळिमा फासणारी आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांचा अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाला. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या विजयाला संमती देण्यात आडकाठी आणायचे हीन कृत्य केले. काल अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प यांच्या समर्थकांनी धुडगूस घातला. तो प्रकार अत्यंत निषेधार्ह आणि लोकशाही विरोधी असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले.

आजवर जगात कोणत्याही देशात अल्पमतात असताना बहुमताचा सन्मान केला नाही, असे कधीही घडले नाही ते अमेरिकेत ट्रम्प करीत आहेत. ट्रम्प यांनी निवडणुकीत झालेला पराभव स्वीकारून नव्याने पुढील निवडणुकीसाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. पण पराभव न स्वीकारता जनमताचा अनादर करून ट्रम्प यांनी रिपब्लिकनचा आणि लोकशाहीचा अवमान केला असल्याचे रामदास आठवले म्हणाले आहेत.

लोकशाहीच्या न्यायानुसार भारतात ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत बहुमताचा; जनमताचा सन्मान केला जातो. पण जगात महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत सत्तांतर होताना ट्रम्प यांनी केलेला प्रकार लोकशाहीला मारक आहे. त्यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नसल्याचा घणाघात रामदास आठवले यांनी केला आहे.