फेसबुकवर आता Like करता येणार नाही कोणाचेही पेज


नवी दिल्ली – दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने नव्या वर्षाच्या सुरूवातीला काही मोठे बदल केले आहेत. फेसबुकने आपल्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपच्या पॉलिसीमध्ये नुकतेच काही बदल केल्यानंतर आता फेसबुक पब्लिक पेजमधून ‘Like’ बटण कंपनीने हटवले आहे. लोकप्रिय व्यक्तिमत्व, कलाकार, खेळाडू, नेते किंवा अन्य संस्था व ब्रँड्सद्वारे बनवलेल्या पब्लिक पेजला कंपनीने रिडिझाइन केले असून त्यातून ‘Like’ बटण पेजमधून हटवण्यात आले आहे.

‘Like’ बटण पेजमधून हटवल्यामुळे फेसबुक पेजवर आता केवळ फॉलोअर्स दिसतील, तसेच तिथे एक वेगळे न्यूज फीड असेल युजर्स कन्व्हर्सेशनमध्ये सहभागी होऊ शकतात. लाइक आणि फॉलो असे दोन पर्याय फेसबुकवर मिळतात. पण आता अपडेटनंतर तुम्हाला केवळ फॉलो हाच पर्याय मिळेल. पण एखाद्या पोस्टसाठी आधीप्रमाणेच लाइक बटण मिळेल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

लाइक बटण हटवल्यामुळे पब्लिक पेजवर कंटेंटची क्वालिटी अजून सुधारेल, आपल्या आवडीच्या पेजसोबत फॉलोअर्सना कनेक्ट होण्याची प्रक्रिया सोपी व्हावी, असा आमचा हेतू असल्याचे कंपनीने जारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. फेसबुकने नव्या अपडेटबाबत एका ब्लॉगद्वारे माहिती दिली आहे.