जेफ बेजोसला मागे टाकत मस्क बनले धनकुबेर नंबर वन

फोटो साभार इंडिया टीव्ही

गेली तीन वर्षे म्हणजे २०१७ पासून जागतिक धनकुबेराच्या यादीत प्रथम स्थानावर राहिलेल्या अमेझॉनच्या जेफ बेजोस यांना मागे टाकून टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे सीईओ एलन मस्क यांनी धनकुबेर नंबर वन बनण्याचा पराक्रम केला आहे. गुरुवारी मस्क यांच्या कंपनी शेअरने ४.८ टक्के उसळी घेतल्याने मस्क यांच्या संपत्तीत वाढ होऊन ती १८८.५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली.

ब्लूमबर्ग इंडेक्स नुसार बेजोस यांच्यापेक्षा मस्क यांची संपत्ती दीड अब्ज डॉलर्सने अधिक झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले ४९ वर्षीय मस्क इंजीनीअर असून टेस्ला ऑटो प्रमाणेच स्पेस एक्सचे सीईओ आहेत. अंतराळ प्रवास रेस मध्ये त्यांची स्पर्धा बेजोस यांच्या ब्लू ओरिजिन एलएलसी कंपनीबरोबर आहे. जगभरात गत वर्षात करोनामुळे आर्थिक मंदी असतानाही गेल्या वर्षात मस्क यांची संपत्ती १५० अब्ज डॉलर्सने वाढली आहे. यात सर्वात मोठा वाटा टेस्ला शेअर्सचा आहे. गतवर्षात टेस्लाचे शेअर ७४३ टक्क्याने वाढले आहेत.

६ जानेवारी रोजी मस्क यांची संपत्ती १८४.५ अब्ज डॉलर्स होती आणि तेव्हा बेजोस यांची संपत्ती १८७ अब्ज डॉलर्स होती. मस्क यांच्या टेस्लाने गेल्या वर्षात ५ लाख इलेक्ट्रिक कार्स विकल्या आहेत.