मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर की एकत्रित लढणार? अजित पवारांनी केले स्पष्ट


मुंबई – राज्यातील सत्तेत भागीदार असताना देखील काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनेदेखील तयारी केली असल्यामुळे मुंबई महापालिका महाविकास आघाडी एकत्रित लढणार की स्वबळावर अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सध्या तरी मित्रपक्षांसोबत आघाडी करुन पुढे जायचे अशी चर्चा राष्ट्रवादीत सुरु आहे. आमच्या वरिष्ठांना अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आहे. सर्वांशी चर्चा करुन शरद पवार, जयंत पाटील निर्णय घेतील. पण आमची मानसिकता आघाडी करावी, मतांची विभागणी होऊ नये अशीच आहे. मतांची विभागणी होऊन ना मला, ना धड तुला, दे तिसऱ्याला असे होऊ शकते. याबाबतीत मी तरी सकारात्मक असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे समीकरण मुंबई महापालिकेसाठी जुळू शकते का ? असा प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, याबाबत आधीच अंदाज व्यक्त करणे चुकीचे आहे. बाळासाहेब थोरात, भाई जगताप यांच्यासोबत आम्ही चर्चा करु. महाविकास आघाडीला अडचण होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न असेल.

किमान समान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी पुढे आली. यावर गेल्या एक वर्षापासून काम सुरु आहे. नामांतराच्या मुद्द्यावर एकत्र बसून चर्चा करु आणि मार्ग काढू, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. पुण्याचे नाव बदलण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केल्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, कोणी काय मागणी करावे हा ज्याच्या त्याचा आधिकार आहे. कोणी भावनिक मुद्दे काढते, कोणी विकासाबद्दल, तर कोणी नामकरणाबद्दल बोलते. महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या इतिहासात अशा वेगवेगळ्या गोष्टी घडल्या आहेत.

एका शहराचा मुद्दा अशा काळात आला तर दुसऱ्या शहरांचाही उल्लेख होतो. आपल्या वक्तव्याच्या बातम्या झाल्या की मग इतरांनाही सुचू लागते. सर्वांना मागणी करण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. हे आघाडीचे सरकार आहे. महाविकास आघाडी टीकावी आणि विकासाला महत्व द्यावे ही शरद पवारांची भूमिका असून आम्ही देखील त्याचे समर्थन करुन पुढे जात आहोत.