अमेरिकन काँग्रेसकडून बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब


वॉशिंग्टन – अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी घातलेल्या गोंधळामुळे पोलिसांची आणि ट्रम्प समर्थकांची जुंपली. एका महिलेसह 4 जणांचा या हाणामारीत मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. नवे राष्ट्रपती जो बायडन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची संवैधानिक प्रक्रिया या गोंधळामुळे काही वेळ रखडली होती. बुधवारी इलेक्टोरल कॉलेजच्या मतांची मोजणी काँग्रेस सदस्य करत होते. त्यावेळी ट्रम्प समर्थक मोठ्या संख्येने कॅपिटॉल इमारतीमध्ये घुसले. पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी बळाचा वापर केल्यामुळे समर्थक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला.

प्रतिनिधी सभा आणि कॅपिटॉल इमारत या गोंधळामुळे बंद करण्यात आली. उपराष्ट्रपती माइक पेंस आणि खासदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. परिस्थिती चिघळत असल्याने राजधानीत कर्फ्यू लावण्यात आला. तरीही ट्रम्प समर्थक कर्फ्यूचे उल्लंघन करत मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. या गोंधळातच पोलीस बंदोबस्तात इलेक्टोरल मतमोजणी करण्यात आली. बायडन यांना 270 मते मिळाल्याची पुष्टी झाल्यावर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आता ते अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांच्या एरिझोना येथील विजयाला ट्रम्प यांनी दिलेले आव्हान अमेरिकी संसदेच्या दोन्ही सदनात फेटाळण्यात आले आहे. हे आव्हान रद्द करत बायडन यांचा एरिझोनातून विजय झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 93 च्या मताधिक्याने हे आव्हान फेटाळण्यात आले. तसेच इलेक्टोरल मतमोजणीला रिपब्लिकन पक्षाकडून देण्यात आलेले आव्हानही फेटाळण्यात आले आहे. हा आक्षेप 92 मतांनी फेटाळण्यात आला.

20 जानेवारीला अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन पदाची शपथ घेणार आहेत. पण देशात अराजकतेची स्थिती निर्माण झाल्याने 20 जानेवारीपूर्वीच कार्यकाळ पूर्ण होण्यआधीच ट्रम्प यांना पदावरून हटवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ट्रम्प यांना कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पदावरून हटवण्याबाबत विचार सुरू आहे. अमेरिकेतील संविधानानुसार 25 व्या घटनादुरुस्तीनुसार ट्रम्प यांना त्यांचे कॅबिनेट पदावरून हटवू शकते. त्यामुळे याबाबतही विचार सुरू आहे. त्याबाबतचा निर्णय झाल्यास कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच ट्रम्प यांना पायउतार व्हावे लागणार आहे. अमेरिकेतील अनेक खासदारांनी ट्रम्प यांना पदावरून तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. ट्रम्प यांनी समर्थकांना चिथावणी दिल्यानेच कॅपिटल इमारतीतील घटना घडल्याचा आरोप या खासदारांनी केला आहे.