तिसरी कसोटी; पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या दोन बाद १६६ धावा


सिडनी – ऑस्ट्रेलियन संघाने मार्नस लाबुशेन (६७*) आणि विल पुकोवस्की (६२)यांनी ठोकलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर पहिल्या दिवसावर वर्चस्व राखले आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाखेर दोन गड्यांच्या मोबदल्यात १६६ धावा केल्या आहेत. लाबुशेन (६७) आणि स्मिथ (३०) दिवसाखेर नाबाद आहेत. सिराज आणि सैनी यांना भारतीय संघाकडून प्रत्येकी एक एक विकेट घेण्यात यश मिळाले. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे सामना सात षटकानंतर थांबवण्यात आला होता. त्यामुळे पहिल्या दिवशी ५५ षटकांचा सामना खेळवण्यात आला.

सिराजने दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला पाच धावांवर माघारी धाडल्यानंतर भारतीय संघ सामन्यात वरचढ होणार, असे वाटले होते. पण संयमी फलंदाजी पदार्पण करणाऱ्या पुकोवस्कीने केली. लाबुशेन याने पुकोवस्कीला उत्तम साथ दिली. दुसऱ्या गड्यासाठी पुकोवस्की-लाबुशेन यांनी १०० धावांची भागिदारी केली. अखेर पदार्पण करणाऱ्या सैनीने पुकोवस्कीला पायचीत करत ही जोडी फोडली. पुकोवस्कीने ६२ धावांची खेळी केली.

पुकोवस्की बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या स्मिथने लाबुशेनबरोबर संथ असलेली धावसंख्या वाढवली. दोघांनी एकदिवसीय सामन्याप्रमाणे फटकेबाजी केली. पुकोवस्की बाद झाल्यानंतर लाबुशेन याने सामन्याची सुत्रे आपल्याकडे घेतली. आपल्या कारकीर्दीतील नववे अर्धशतक लाबुशेन याने झळकावले. त्याला स्मिथने चांगली साथ दिली. स्मिथ आणि लाबुशेन यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६० धावांची नाबाद धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाची स्थिती आणखी मजबूत केली आहे. भारताकडून सिराज-सैनीचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला बळी घेण्यात यश आले नाही. बुमराह, अश्विन आणि जाडेजाची पाटी दिवसाखेर कोरीच राहिली.