राम कदम यांच्याकडून सोनू सूदची पाठराखण


मुंबई: अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकामप्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यामुळे आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना आमनेसामने उभी ठाकली आहे. शिवसेनेला खटकत असल्यामुळेच सोनू सूदवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप भाजपने केल्यामुळे दोन्ही पक्षात कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे हा गुन्हा दाखल झाल्याने सोनू पुढे काय करणार? याबाबतची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

या प्रकरणात उडी घेऊन शिवसेनेवर भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी जोरदार टीका केली आहे. सोनूविरोधात कारवाई केवळ सूड भावनेतूनच करण्यात आली आहे. जनतेला लॉकडाऊन काळात मदत करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले होते. त्यावेळी जे सरकारने करायला हवे ते काम सोनूने केले होते. लोकांना प्रत्यक्ष भेटून सोनूने मदत केल्यामुळे शिवसेनाचा जळफळाट झाला होता. त्यामुळेच सोनूवर कारवाई करण्यात आल्याचा दावा राम कदम यांनी केला आहे.


आधी कंगनावर कारवाई केली. त्या पाठोपाठ सोनू सूदवर कारवाई करण्यात येते. हे ठाकरे सरकार आहे की सुडाचे सरकार? कंगनाच्या कार्यालयावर जेसीबी पाठवला. आता सोनूचा नंबर? गरीब मजुरांना स्वत:च्या पैशाने गावी पाठवण्याचे काम सरकारचे होतं. ते सोनू सूदने केले. त्याचा दोष काय? एवढा द्वेष येतो कुठून? असा सवाल त्यांनी केला.

तसेच सोनूचे हॉटेल कोरोना संकट काळात क्वॉरंटाईन सेंटर म्हणून चालले. त्यावेळी हे हॉटेल अनधिकृत नव्हते. आता अचानक हे हॉटेल अनधिकृत कसे झाले? आपण अनधिकृत हॉटेलात क्वॉरंटाईन सेंटर तर तयार करत नाही ना? याची पडताळणी पालिका अधिकाऱ्यांनी का केली नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.