ज्यांना शेतीमधले काही कळत नाही ते विधेयकांचे समर्थन कसे करतील – नारायण राणे


कणकवली – केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ आज कणकवली येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी बोलताना भाजप नेते नारायण राणे म्हणाले की, नवा कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा असून सर्व बंधने या कायद्याने काढून टाकली तर मग काय चुकले? का येथे आंदोलने होत आहेत? ही राजकीय आंदोलने आहेत. त्यामुळे यात समेट होईल, असे मला वाटत नाही. शेतीमधले राहुल गांधींना, उद्धव ठाकरेंना काय कळते? ज्यांना या गोष्टीबद्दल काहीच कळत नसल्यामुळे ते या विधेयकांचे समर्थन कसे करणार? अशा शब्दांमध्ये आज कणकवली येथून काँग्रेस नेते राहुल गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्र सरकारच्या कृषी कायद्यास विरोध करणाऱ्यांवर तोफ डागली.

नारायण राणे यावेळी म्हणाले, एका बाजूला देशाला महासत्ता बनवण्याचा पंतप्रधान मोदींकडून प्रयत्न सुरू आहेत व दुसऱ्या बाजूला नागरिकांना समृद्ध करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. तसेच, शेतकरी हा या देशाचा प्रमुख घटक आहे. आमच्या शेतकऱ्याला सबळ बनवले पाहिजे, आर्थिक समृद्ध बनवले पाहिजे. या कष्टकऱ्याला त्याच्या श्रमाचा फायदा मिळाला पाहिजे. या दृष्टीकोनातूनच त्यांनी हे विधेयक आणले आहे.

तसेच, राज्यसभेचा मी सदस्य आहे. हे विधेयक राज्यसभेत आले तेव्हा अतिशय चांगली चर्चा झाली. आमच्या विरोधकांपैकी कुणी तेव्हा विरोध दर्शवला नाही, उलट कौतुक केले. काँग्रेसला जे ७० वर्षांमध्ये जमले नाही. जे शेतकऱ्यांसाठी काही करू शकले नाहीत. आज तेच विरोध करत आहेत, आंदोलन करत आहेत. कोण आहेत विरोधक? स्वतः करू शकले नाहीत. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकायला देखील बंधने, कायदे होते. माल कुठे विकायचा? कसा विकायचा? कोणा मार्फत विकायचा? का दलाल मार्फत विकायचा मग कष्टाचे पैसै मिळाले नाही तरी तोट्यात जाऊन विकायचा. ही गेली ७० वर्षांमधील कायदे व नियम पंतप्रधान मोदींनी मोडीत काढल्याचे देखील राणेंनी यावेळी सांगितले.

जे काही आपला शेतकरी कष्टाने पिकवतो, उत्पादन घेतो. त्याला जिथे जास्त पैसे मिळतील, त्याने तिथे माल विकावा. योग्य मोबदला मिळाला याचे शेतकऱ्यांना समाधान मिळाले पाहिजे. म्हणून पंतप्रधान मोदींनी असा कायदा आणला. शेतकऱ्यांच्या हिताची बंधने सर्व काढून टाकली, तर मग चुकले काय? येथे का आंदोलने होत आहेत? ही राजकीय आंदोलने आहेत. यात समेट होईल, असे मला वाटत नाही. शेतीमधले राहुल गांधीला काय कळते? आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचा गोष्टी करतात. आंदोलनकर्ते ठराविक राज्यातील शेतकरी आहेत. जे दलाल होते त्यांना आंदोलन करायला लावले आहे, कामाला लावले आहे, खर्चाला लावले असल्याचे देखील राणेंनी यावेळी बोलून दाखवले.