भाजपकडून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या जबाबदारीचे वाटप


मुंबई : नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये भाजपने आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या जबाबदारीचे वाटप केले आहे. नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी आशिष शेलार यांना प्रभारी म्हणून नेमले आहे. तर गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समतोल राखत पालिका निवडणुका जिंकून देण्याचे आव्हान आता आशिष शेलार यांच्यापुढे आहे. तर भाजपने इतर महापालिका निवडणुकीसाठी मुख्य जबाबदारी आणि प्रभारी यांचे वाटप निश्चित करत निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची मुंबईत मंगळवारी (5 जानेवारी) बैठक पार पडली. आगामी ग्रामपंचायत, महापालिका निवडणुकीची रणनीति या बैठकीत ठरवण्यात आली. नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूरसह पाच महापालिकांच्या निवडणुका आगामी काही दिवसात होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवडण्यापासून ते निवडून येण्याची क्षमता असलेल्या इतर पक्षातील उमेदवारांना भाजपत प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यावरही चर्चा झाली. भाजपने बहुतांश महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. पण काही ठिकाणी शक्य असेल तर स्थानिक आघाडी करुन भाजप निवडणूक लढणार आहे.

दरम्यान भाजपने कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांची 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून निवड केली होती. ही घोषणा 18 नोव्हेंबर 2020 रोजी झाली होती. भाजपने शिवसेनेचा गड समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी तयारी सुरु केली आहे. केवळ मुंबई महापालिकाच नाही तर आगामी सर्व महापालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यादृष्टीने पक्षाने संघटनात्मक बैठकांमध्ये जबाबदारीचे वाटप केले आहे.

भाजपने कोणाला दिली कोणती जबाबदारी
1. नवी मुंबई महापालिका
निवडणूक प्रमुख -गणेश नाईक
निवडणूक सहप्रमुख – मंदा म्हात्रे
निवडणूक संघटनात्मक प्रमुख – संजय उपाध्याय
निवडणूक प्रभारी – आशिष शेलार

2. कल्याण डोंबिवली महापालिका
निवडणूक प्रमुख – रवी चव्हाण
निवडणूक प्रभारी – संजय केळकर.

3.औरंगाबाद महापालिका निवडणूक
निवडणूक प्रमुख – अतुल सावे
निवडणूक प्रभारी – गिरीश महाजन
निवडणूक संघटनात्मक जबाबदारी – संभाजी पाटील निलंगेकर.

4. कोल्हापूर महापालिका निवडणूक
निवडणूक प्रमुख – धनंजय महाडिक आणि महेश जाधव.
निवडणूक प्रभारी – शेखर इनामदार, रणजित सिंह निंबाळकर

5. वसई-विरार महापालिका निवडणूक
निवडणूक प्रभारी – प्रसाद लाड
निवडणूक सहप्रभारी – जयप्रकाश ठाकूर, भरत राजपूत