यंदा मुख्य पाहुण्यांशिवाय होणार प्रजासत्ताक दिन

या वर्षी २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुण्यांच्याशिवाय साजरा केला जाणार आहे. अर्थात या प्रकारे मुख्य पाहुण्यांशिवाय प्रजासत्ताक दिन साजरा होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी १९५२, १९५३ आणि १९६६ या वर्षात सुद्धा मुख्य पाहुणे नसताना हा कार्यक्रम साजरा झाला होता.

यंदा ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते पण ब्रिटन मध्ये करोनाच्या नव्या विषाणूचा प्रभाव प्रचंड वाढल्याने तेथे लॉक डाऊन लावला गेला आहे. यामुळे जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला असून तसा फोन पंतप्रधान मोदी यांना केला होता. मात्र करोना उद्रेक आटोक्यात आल्यावर जॉन्सन भारत भेटीवर येणार आहेत.

प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे ठरविणे ही मोठी प्रक्रिया असून सहा महिने अगोदर त्याची तयारी सुरु होते. ज्यांना पाहुणे म्हणून बोलावयाचे त्या देशाबरोबरचे भारताचे संबंध, राजकीय परिस्थिती, व्यापार, सहकार्य अश्या अनेक गोष्टी त्यासाठी विचारात घेतल्या जातात. त्यातून तयार झालेली यादी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविली जाते आणि पंतप्रधानांची एका नावाला संमती मिळाली की अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतीना पाठविली जाते.

यापूर्वी १९५२, १९५३ आणि १९६६ मध्ये प्रजासत्ताक दिनाला कुणीच पाहुणे नव्हते तर १९५६, १९६८ आणि १९७४ साली दोन प्रमुख पाहुणे होते. २०१८ मध्ये १० आशियाई देशांचे प्रमुख प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. प्रजासत्तक दिनाचे पाहुणे हा भारतीय प्रोटोकॉल प्रमाणे सर्वात मोठा सन्मान मानला जातो. स्वतः राष्ट्रपती त्यांचे आदरातिथ्य करतात, त्यांना राष्ट्रपती भवन येथे गार्ड ऑफ ऑनर दिला जातो, स्वागत समारोह होतो, पाहुण्यांच्या हस्ते राजघाट येथे पुष्पांजली अर्पण केली जाते आणि मेजवानी दिली जाते.