नेपाळ भारताकडून घेणार कोविड लस

जगभरात कोविड १९ लसीकरण कार्यक्रम आखले जात असताना नेपाळ कोविड लस भारताकडून खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे. नेपाळ मध्ये राजकीय संग्राम सुरु असतानाच नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली १५ जानेवारीला भारत भेटीवर येत असून ते भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा करणार आहेत. नेपाळ भारत संयुक्त आयोगाची ही ६ वी बैठक असून चीनच्या नेपाळ वरील वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.

नेपाळच्या अंतर्गत प्रश्नात चीन सतत दखल देत आहे. भारत नेपाळ सीमेवर तणाव आहे आणि चीनने नेपाळला सिनोवॅक्स ही चीननिर्मित करोना लस देण्याची तयारी दाखविली आहे. मात्र नेपाळने भारताची करोना लस घेण्यास प्राधान्य दिले आहे. नेपाळला भारताकडून कोविड लसीचे १.२ दशलक्ष डोस अपेक्षित आहेत.

नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी संसद भंग केली असून तेथे ३० एप्रिल ते १० मे दरम्यान सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. भारताच्या नेपाळी दुतावासातील राजदूत निलांबर आचार्य यांनी भारतीय लस उत्पादक आणि सरकारी अधिकारी यांच्यासोबत लस खरेदीसाठी बोलणी केली असल्याचे सांगितले जात आहे. आचार्य यांनी भारत बायोटेकचे प्रमुख डॉ.व्ही. कृष्णमोहन यांचीही भेट घेऊन चर्चा केल्याचे वृत्त आहे.