एआय तंत्रज्ञानाने माणसाच्या मृत्यूची वेळ कळू शकणार

फोटो साभार झी न्यूज

एखाद्या आजाराने पिडीत रुग्णाचा मृत्यू कधी होईल याचा अंदाज अगोदरच बांधणे शक्य होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. या कामी एआय तंत्रज्ञान विशेष उपयुक्त ठरत असल्याचे दावा पेंसिल्वानियाच्या गीसिंजर हेल्थ सिस्टीम मधील संशोधकांनी केला आहे. आर्टिफीशीयल इंटेलिजन्स म्हणजे एआय तंत्रज्ञान मानवी जीवनात महत्वाची भूमिका बजावत असल्याचे पदोपदी जाणवत आहे आणि यामुळेच या क्षेत्रात जगभरात मोठ्या प्रमाणात संशोधन केले जात आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने इतरवेळी अशक्य वाटतील अशी अनेक कामे सोपी आणि सहज करून टाकली आहेत.

एआय स्टँडर्ड ईसीजी टेस्ट मदतीने कोणत्याही रुग्णाचा एक वर्षाच्या आत मृत्यू होणार असेल तर त्यामागचे कारण समजू शकते असा या संशोधकांचा दावा आहे. यासाठी या संशोधकांनी ४० हजार रुग्णांच्या १७ लाखाहून अधिक ईसीजी टेस्टच्या परिणामांचे विश्लेषण केले आहे. एआय च्या न्यूरल नेटवर्क मॉडेलने ने काढलेले हे निष्कर्ष अचूक आणि आश्चर्यजनक आहेत. ज्या रुग्णांचे ईसीजी रिपोर्ट सामान्य वाटत होते त्यातली मुख्य समस्या या तंत्रज्ञानामुळे स्पष्ट झाली असे समजते. यामुळे ईसीजी रिपोर्ट भविष्यात अधिक सहजपणे समजून घेणे शक्य होणार आहे.

एआय म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता. माणसाप्रमाणे विचार करणारे एक मशीन असेही याला म्हणता येते.