हा आहे रेकॉर्डब्रेक महागडा केक
फोटो साभार टाईम्स ऑफ इंडिया
काहीतरी हटके करून जगप्रसिद्धी मिळविण्यात अनेक लोक माहीर असतात. मुळात त्यांची विचार करण्याची पद्धतच वेगळी असते आणि त्यामुळे ते असे चमत्कार करू शकतात. वाढदिवस, लग्नसमारंभ या सारख्या कार्यक्रमात आजकाल केक ही अत्यावश्यक बाब बनली आहे. त्यामुळे आपापल्या ऐपतीप्रमाणे लोक केक बनवून घेतात. पण केक महाग असून असून किती असेल याचा अंदाज आपण सहज बांधू शकत नाही. आता हेच पहा, दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये नववर्षानिमित्त भरलेल्या ब्रायडल शो केस मध्ये असाच एक केक पेश करण्यात आला असून त्याने किमतीची सर्व रेकॉर्ड मोडली आहेत. या केकची किंमत १ कोटीपेक्षा अधिक आहे.
सोशल मीडियावर या केकचे फोटो व्हायरल झाले आहेत. दुबईची सेलेब्रिटी केक डिझायनर डेबी विंघम हिने हा केक अतिशय मेहनतीने बनविला असून तो एखाद्या खऱ्याखुऱ्या नववधू प्रमाणे दिसतो आहे. दहा दिवसांपेक्षा जास्त काळ हा केक बनविण्यासाठी लागला आणि त्यात अनेक महागड्या वस्तूंचा वापर केला गेला आहे. या केकवर १ हजार खरे मोती, ५ हजार फुले वापरली गेली असून २५ किलो चॉकलेट आणि १ हजार अंडी सुद्धा वापरली गेली आहेत. केकचे वजन आहे १०० किलो. विंघमने सर्वात महाग केक बनविण्याचे रेकॉर्ड तिच्या नावे केले आहे.