या देशांत घेऊ शकता लॉंग ड्राईव्हचा आनंद
गेले वर्षभर करोना उद्रेकामुळे घरात अडकून पडलेल्या लोकांना आता भटकंतीचे वेध लागले आहेत. पर्यटन किंवा भटकंतीसाठी जायला अनेक जागा आहेत पण परदेशात जाऊन स्वतः लॉंग ड्राईव्हचा आनंद लुटायचा असेल तर या देशांचा विचार तुम्ही करू शकता कारण येथे भारतीय वाहन चालक परवान्याला मान्यता आहे. अर्थात त्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. पण परदेशात स्वतः वाहन चालवून मनसोक्त भटकंती करायचा आनंद नक्कीच वेगळा आहे.
सिंगापूर देशात भारतीय ड्राईव्हींग लायसन्स एक वर्षासाठी वैध आहे मात्र येथे इंग्रजी येणे अनिवार्य आहे. दुसरा देश आहे जर्मनी. येथेही तुम्ही प्रवेश केल्याच्या पहिल्या दिवसापासून सहा महिन्यापर्यंत तुमचा परवाना वैध मानला जातो. त्यानंतर स्थानिक आरटीओ ऑफिसशी संपर्क साधून पुढील परवाना मिळविता येतो.
इंग्लंड येथेही तुमचा वाहन परवाना एक वर्षासाठी वैध मानला जातो. या काळात तुम्ही स्कॉटलंड आणि वेल्स मधेही वाहन चालवू शकता. नॉर्वे मध्ये तुमचा वाहन परवाना ३ महिन्यासाठी वैध आहे. मात्र येथेही इंग्रजी येणे आवश्यक आहे. स्विझर्लंड मध्ये भारतीय वाहनचालक परवाना एक वर्षासाठी वैध असून नंतर तेथील संबंधित आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून पुढील कारवाई करता येते. अर्थात या सर्व ठिकाणी वाहतूक नियम कसोशीने पाळणे आवश्यक आहे.