ज्या कंपनीत विराटने केली गुंतवणूक बीसीसीआयने त्याच कंपनीला दिले कंत्राट


नवी दिल्ली – २०१९ मध्ये एका गेमिंग कंपनीमध्ये विराट कोहलीने गुंतवणूक केली होती. आज तिच कंपनी बीसीसीआयच्या प्रमुख प्रायोजकांपैकी एक असल्याचे समोर आल्यामुळे विराट कोहलीने केलेल्या एका गुंतवणुकीमुळे लाभाच्या पदाचा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्यावर्षी बीसीसीआय आणि MPL (Mobile Premiere League) यांच्यात टीम इंडियाच्या किट स्पॉन्सरसाठी ३ वर्षांचा करार झाला. हा करार नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२३ पर्यंत करण्यात आला असून बीसीसीआयला या मार्फत प्रत्येक सामन्यामागे ६५ लाखांचा निधी मिळणार आहे. टीम इंडियाचा किट स्पॉन्सर असलेल्या Nike कंपनीने लॉकडाउन काळात करार वाढवून घेणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर बीसीसीआयने नवीन स्पॉन्सरसाठी MPL सोबत करार केला आहे.

विराट कोहलीने बंगळुरु येथील गॅलॅक्टस फनवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणुक केली होती. याच कंपनीच्या मालकीचा मोबाईल प्रिमिअर लीग (एमपीएल) हा ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म आहे. एप्रिल २०१८ मध्ये या कंपनीची सिंगापूरमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. विराट कोहली जानेवारी २०२० मध्ये एमपीएलचा ब्रँड अँबेसेडर असल्याचे घोषित करण्यात आले होते.

एमपीएलची एक सर्वसाधारण सभा फेब्रुवारी २०१९ मध्ये पार पडली होती. विराट कोहली तसेच कॉर्नरस्टोन नावाच्या कंपनीला यामध्ये कर्जरोखे देण्याचा निर्णय घेण्यात आला. कॉर्नरस्टोन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सजदेह हे मॅगपी व्हेंचर्स पार्टनर्स एलएलपी आणि विराट कोहली स्पोर्ट्स एलएलपीमध्ये विराट कोहलीचे भागीदार आहेत. सजदेह हे कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंट कंपनीचे एक संचालक असून त्यांच्याकडे कोहली, केएल राहुल , रिषभ पंत, उमेश यादव यासारख्या भारतीय खेळाडूच्या व्यावसायिक हक्कांचे व्यवस्थापन करण्याचे काम आहे.