देशातील सर्वात आनंदी शहरांच्या यादीमध्ये लुधियाना, अहमदाबाद आणि चंदिगड ही तीन शहरे अव्वल स्थानी


नवी दिल्ली – नुकतीच देशातील सर्वात आनंदी शहरांची यादी जाहिर करण्यात आली आहे. ‘इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’च्या या यादीमधील देशातील सर्वाधिक आनंदी शहरांपैकी अव्वल २५ शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे. या यादीमधून आनंदी राहण्याच्या बाबतीत पुणेकरांनी मुंबईकर आणि नागपूरकरांना धोबीपछाड दिल्याचे दिसून येत आहे. देशातील सर्वात आनंदी असणाऱ्या ३४ शहरांची यादी यामध्ये देण्यात आली आहे.

ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२० दरम्यान देशभरातील वेगवेगळ्या शहरांमधील १३ हजारहून अधिक जणांचे सर्वेक्षण करुन प्राध्यापक राजेश पिल्लानिया यांनी ही यादी तयार केली आहे. मागील अनेक दशकांपासून व्यवस्थापनसांदर्भातील संशोधनामध्ये राजेश हे कार्यरत असून भारतातील वेगवेगळ्या शहरांमधील हॅपीनेस इंडेक्स म्हणजेच आनंदी राहण्याच्या प्रमाणासंदर्भातील माहिती त्यांच्या या प्रोजेक्टमुळे पहिल्यांदाच समोर आली आहे.

लुधियाना, अहमदाबाद आणि चंदिगड ही तीन शहरे देशातील सर्वात आनंदी शहरांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहेत. तर अहमदाबाद, हैदराबाद आणि नवी दिल्ली ही शहरे टू टीयर सीटींच्या यादीमध्ये सर्वाधिक आनंदी शहरे ठरली आहेत. त्याचप्रमाणे लुधियाना, चंदिगड आणि सुरत या तीन शहरांनी टू-टीयर सिटींच्या यादीत बाजी मारली आहे. ही यादी वयोमान, शिक्षण, कमाई आणि एकंदरीत एखाद्या शहरात राहताना मिळणाऱ्या सुखसोयी तसेच जीवनशैली यांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणात मोठ्या शहरांमध्ये अविवाहित नागरिक हे विवाहितांपेक्षा अधिक आनंदी असल्याचेही दिसून आले आहे.

या यादीमध्ये महाराष्ट्रामधील तीन शहरांचा समावेश असून या यादीत राज्याची संस्कृतिक राजधानी असणारे पुणे शहर १२ व्या स्थानी आहे. राज्याची उपराजधानी असणारे नागपूर शहर १७ व्या स्थानी तर राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई २१ व्या स्थानी आहे. सर्वाधिक आनंदी शहरांच्या यादीमध्ये गुजरातमधील अनेक शहरांचा समावेश आहे.