देशातील कोरोना लसीकरणाला 13 जानेवारीपासून होऊ शकते सुरुवात; आरोग्य सचिव राजेश भूषण यांची माहिती


नवी दिल्ली – ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) 3 जानेवारी रोजी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या कोरोना प्रतिबंधल लसींच्या आपातकालीन वापरास परवानगी दिल्यानंतर आता आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की देशात 10 दिवसांत कोरोना लसीकरण सुरू होऊ शकते. कोव्हॅक्सिन वापरण्यापूर्वी संमती घेणे आवश्यक आहे. मंजुरी मिळाल्यानंतर 10 दिवसानंतर ही लस देणे चालू होऊ शकेल. कोरोनावरील पत्रकार परिषदेमध्ये आरोग्य मंत्रालयाने हे सांगितले. देशातील वेगवेगळ्या राज्यात केले जाणारे लसीचे ड्राय रनही यशस्वी ठरले असल्याची माहिती देण्यात आली.

मंगळवारी मोठी घोषणा करताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, 13 जानेवारीला भारतात पहिली कोरोना व्हायरस लस दिली जाऊ शकते. आरोग्य मंत्रालयाने ही घोषणा ड्राय रनच्या रिझल्ट्सच्या आधारे केली आहे. भूषण यांनी म्हटले आहे की, आपातकालीन वापर ऑथोरायझेशन झाल्यापासून दहा दिवसांच्या आत लसीकरण सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि दोन कोटी फ्रंटलाईन कर्मचार्‍यांसह अतिरीक्त प्राधान्य असणार्‍या लोकांना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मोफत लस उपलब्ध करुन देण्यात येईल. पुढे प्राधान्याच्या आधारे जुलै पर्यंत 27 दशलक्ष लोकांना लसी दिली जाईल,

त्याचबरोबर आरोग्य मंत्रालयाने असे देखील स्पष्ट केले आहे की, संपूर्ण तयारीसह लसीकरण सुरू केले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेवर डिजिटल माध्यमातून पाळत ठेवली जाईल. लसीकरणासाठी फ्रंटलाइन वर्कर्सना नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. लसीकरण पथकात 5 लोक असतील तसेच लस साठवण्यासाठी देशात 41 हजार कोल्ड स्टोरेज आहेत. अशाप्रकारे येत्या 10-15 दिवसात लसीकरण सुरु होईल यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.