सतत अपमानित करणाऱ्या शिवसेनेपुढे काँग्रेसने टेकले गुडघे – राम कदम


मुंबई – आपला स्वाभिमान हा काँग्रेसने गमावला असून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या, १२ महिन्यांमध्ये सतत अपमानित करणाऱ्या शिवसेनेपुढे काँग्रेसने गुडघे टेकले असल्याचे म्हणत भाजप नेते राम कदम यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. औरंगाबादच्या नामांतरावरूनही गेल्या काही दिवसांपासून राजकारण सुरू आहे. काँग्रेसला सत्तेची एवढी हाव आहे की काँग्रेसचे कार्यकर्ता किंवा राहुल गांधी किंवा सोनिया गांधी या महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्षपदही ठरवणार नाहीत. तेदेखील शिवसेना ठरवेल? काँग्रेसचा स्वाभिमान संपला असल्याचे म्हणत कदम यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.


काँग्रेस म्हणून आम्ही महाविकास आघाडीत घटक पक्ष आहे, पण आमचा नामांतराला विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितले होते. कॉमन मिनिमम प्रोग्राम महाविकास आघाडीमध्ये ठरलेला असल्यामुळे नाव बदलासंदर्भात जेव्हा प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण, तसा कुठलाही प्रस्ताव अद्याप समोर नसल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले होते. सत्तासुद्धा आम्हाला दुय्यम ठरते, आम्ही सत्तेत राज्यघटनेची शपथ घेऊन आलो असल्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नसल्याचे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब थोरातांनी ठामपणे सांगितले होते.