काय आहे कोविन अॅप?

फोटो साभार हिंदुस्तान टाईम्स

अॅप कोविन हा कोविड वॅक्सीन इंटेलीजन्स नेटवर्कचा शॉर्टफॉर्म असून केंद्र सरकारने या अॅपच्या माध्यमातून देशभरात कोट्यवधी नागरिकांसाठी आखलेल्या करोना लसीकरण योजनेची तयार केलेली इकोसिस्टीम आहे. लसीकरण सुरु झाल्यावर पहिल्या टप्प्यात सर्वप्रथम ही लस आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने पूर्वीच केली आहे. मात्र जे नागरिक या क्षेत्रात काम करत नाहीत त्यांना करोना लस घेण्यासाठी या अॅपच्या माध्यमातून स्वतः नोंदणी करता येणार आहे.

या अॅप मध्ये आधार प्रमाणीकरण व जवळ जवळ १२ भाषातून लस नोंदणीसाठी एसएमएस करता येण्याची सुविधा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना लस वितरणासाठी रियल टाईम मॉनिटरिंग मोबाईल अॅप्लीकेशन सह एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला आहे आणि त्यात डेटा साठविता येणार आहे तसेच नागरिक स्वतः लसीकरणासाठी नोंदणी करू शकणार आहेत. यात आधार प्रमाणीकरण असल्याने गडबड घोटाळा होण्याची भीती नाही.

ज्या नागरिकांना लस दिली गेली आहे त्यांना एक युनिक हेल्थ आयडेंटीटी नंबर दिला जाणार असून लस घेतल्यावर काही दुष्परिणाम दिसतात काय याचे ट्रॅकिंग केले जाणार आहे. यासाठी सरकारने प्रशासनिक, रजिस्ट्रेशन, लसीकरण, लाभान्वित स्वीकृती आणि रिपोर्ट अशी पाच मोड्युल तयार केली आहेत. लसीकरण केल्यावर एक क्यूआर कोड सर्टिफिकेट दिले जाईल ते मोबाईल मध्ये स्टोअर करता येणार आहे. कोविन अॅप द्वारे नोंदणी करण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार असून लिंक स्थापित झाली की नोंदणी करणे शक्य होणार असल्याचे समजते.