कोरोना नियमावलीचे उल्लंघन; कॅनडातील भारतीय वंशाच्या महिला खासदाराने दिला राजीनामा


ओटावा – कॅनडियन संसदेच्या सचिव पदाचा भारतीय वंशाच्या महिला खासदाराने राजीनामा दिला असून या महिला खासदाराचे नाव कमल खेरा असे असून कोरोनाची दुसरी लाट कॅनडामध्ये आलेली असतानाच कोरोना नियमावलींचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

कोरोनाचा प्रादुर्भाव कॅनडामध्ये पुन्हा वाढू लागला असून कमल या याच कालावधीमध्ये त्यांच्या काकांच्या निधनानंतर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अमेरिकेमध्ये जाऊन आल्या. पण देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कमल यांनी अशाप्रकारे खासगी कारणासाठी केलेला अमेरिका दौऱ्यावरुन नवीन वाद निर्माण झाला.

एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी निर्बंध कठोर केले जात असतानाच दुसरीकडे नेते मंडळी अशाप्रकारे परदेशी दौरे करत असल्याची टीका कमल यांच्या या अमेरिकेच्या दौऱ्यासंदर्भात सोशल मिडियावर रंगू लागली. गरज असतानाच सर्वसामान्यांनी बाहेर पडा, असे एकीकडे नेतेमंडळी सांगत असतानाच दुसरीकडे ते स्वत: मात्र असे दौरे करत असल्यावरुन अनेकांनी कमल यांनी सुनावले. त्याचबरोबर कमल यांना कोरोना काळात हा दौरा टाळता आला असता, असे मतही अनेकांनी नोंदवले. कमल यांनी याच टीकेमुळे संसदेच्या सचिव पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

कमल या स्वत: नागरिकांना लोकांनी अनावश्यक प्रवास करुन नये. कोरोनाच्या कालावमधीमध्ये अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन करत होत्या. पण अमेरिकेमधून काकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्या स्वत: जाऊन आल्यानंतर त्यांच्या या दौऱ्याविरोधात नागरिकांनी आक्षेप नोंदवला. आपण केलेला अमेरिकेचा दौरा हा एका विशिष्ट हेतूने करण्यात आला होता. अशा दु:खाच्या प्रसंगी कुटुंबासोबत राहता यावे या हेतूने आपण दौरा केला होता, असे कमल यांनी याच टीकेला उत्तर देताना जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यांनी याच पत्रकामध्ये राजीनामा देत असल्याचीही घोषणा केली.

दिल्लीमध्ये कमल यांचा जन्म झाला असून परिचारिकेचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केल्यानंतर त्या कॅनडामध्ये स्थायिक झाल्या. त्या सध्या ब्रॅम्टन पश्चिमच्या खासदार असून तेथील कॅनडीयन भारतीय नागरिकांमधील त्या लोकप्रिय नेत्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अमेरिकेबरोबरच कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर कमल यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात घेतलेल्या पुढाकारावरुन अनेकांनी त्यांचे कौतुक केले होते. कमल या कोरोनाचा संसर्ग झालेल्या कॅनडामधील पहिल्या खासदार होत्या. त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.

राजीनामा देण्यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये कमल यांनी या पुढेही आपण लसीकरण आणि कोरोनासंदर्भातील लढाईमध्ये शक्य ती सर्व मदत करणार असल्याचे म्हटले आहे. माझ्या वडिलांचे मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये निधन झाल्यानंतर काही आठवड्यांनी माझ्या काकांचे निधन झाल्याची माहिती कमला यांनी जारी केलेल्या पत्रात दिली आहे. कमल सिएटलला काकांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गेल्या होत्या.

आम्ही कोणालाही माझ्या काकांच्या श्रद्धांजली सभेसाठी बोलावले नसल्यामुळे तेथे दहा लोकेही उपस्थित नव्हती. मी नंतर त्यांच्या शोकसभेसाठीही गेली नसल्याचे कमल यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. कमल या अमेरिकेला कॅनडामधील संसदेचे सत्र संपल्यानंतर २३ डिसेंबर रोजी गेल्या होत्या आणि त्या ३१ डिसेंबर रोजी पुन्हा कॅनडात आल्या होत्या. याच आठ दिवसांच्या दौऱ्यासाठी आता कमल यांना राजीनामा द्यावा लागला आहे. भारताचे मित्र राष्ट्र असणाऱ्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांच्या कमल या निकटवर्तीय मानल्या जातात. जस्टिन त्रुडो यांनी केलेल्या भारत दौऱ्यादरम्यान कमल त्रुडो कुटुंबासोबतच होत्या.