उर्मिला मातोंडकरांनी ‘सीएम रिलीफ फंडा’ला दिले काँग्रेस निवडणूक निधीचे २० लाख


मुंबई – काँग्रेसच्या निवडणूक निधी खात्यातून २० लाख रुपये शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधी अर्थात सीएम रिलीफ फंडाला दिल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ५० लाखांचा निधी उर्मिला मातोंडकर काँग्रेसकडून देण्यात आला होता. त्यांनी त्यातील २० लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला मदत म्हणून दिले. आता या पैशावरून चर्चा सुरू झाली असून, ऊर्मिला मातोंडकर यांनी त्यावर आपली भूमिका मांडली आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी वर्षभरापूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर उर्मिला यांनी गेल्याच महिन्यात शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, उर्मिला यांना काँग्रेसने २०१९ लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून भाजपचे गोपाल शेट्टी यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती.

उर्मिला मातोंडकर यांनी निवडणूक खर्चासाठी निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे कांदिवलीतील सार्वजनिक बँकेत संयुक्त खाते उघडले होते. या संयुक्त खात्याचे महाराष्ट्र काँग्रेसचे महासचिव अशोक सुत्राळे हे खातेधारक होते. प्रत्येक उमेदवाराला खर्चाचे निवडणूक आयोगाने बंधन घातलेले असून, ७० लाखांपर्यंत उमेदवाराला खर्च करण्याची मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे एप्रिल २०१९ मध्ये ऊर्मिला यांच्या निवडणूक प्रचारासाठी सुरू केलेल्या संयुक्त खात्यात महाराष्ट्र काँग्रेसने ५० लाख रुपये जमा केले होते.

निवडणुकीसाठी या खात्यातून ३० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. तर जुलै २०२० पर्यंत खात्यात २० लाख रुपये शिल्लक होते. या खात्यातील २० लाख रुपये ऊर्मिला मातोंडकर यांनी जुलैमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीला मदत म्हणून दिले. ही मदत काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर देण्यात आल्यामुळे आता याची चर्चा सुरू झाली.

स्वतः ऊर्मिला मातोंडकर यांनी याबद्दल भूमिका मांडली आहे. काही कुख्यात लोक सीएम रिलीफ फंडाला दिलेल्या मदतीवरून कथा रचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या परवानगीनेच लॉकडाउनच्या काळात हे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आले. या पैशाचा वापर कोरोनाच्या काळात लोकांच्या कल्याणासाठीच मी केल्याचे ऊर्मिला यांनी म्हटले आहे.