कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनमधील वादावर पडदा; दोन्ही कंपन्यांचे या क्षणाला प्राण वाचवणे हेच लक्ष्य


नवी दिल्ली – सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या प्रमुखांमध्ये कोरोना लसीच्या परिणामकारकतेच्या मुद्यावरुन झालेल्या शाब्दिक वादानंतर दोन्ही कंपन्यांनी आता संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. दोन्ही कंपन्यांनी लस उपलब्ध करुन देण्यासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प बोलून दाखवला आहे.

सध्याच्या घडीला भारतातील तसेच जगातील लोकांचे प्राण आणि उपजीविका वाचवणे महत्त्वाचे लक्ष्य आहे. लोकांचे प्राण वाचवण्याची तसेच अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्याची ताकत लसीमध्ये असल्याचे अदर पूनावाला आणि डॉ. कृष्णा इल्ला यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. चांगल्या दर्जाची, सुरक्षित आणि परिणामकारक लस जनतेला उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. लसीचे उत्पादन, पुरवठा आणि वितरणावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सिरम आणि भारत बायोटेकने म्हटले आहे.

‘सीरम’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी फायझर, मॉडर्ना आणि आणि ऑक्सफर्डच्या लसी वगळता अन्य लसी ‘केवळ पाण्याइतक्या सुरक्षित’ असल्याची टीका केली होती. त्यानंतर सोमवारी भारत बायोटेकने जोरदार प्रत्युत्तर दिले. लशीच्या २०० टक्के प्रामाणिक चाचण्या केल्या आहेत, आमच्यावरील टीका अनाठायी असल्याचे कंपनीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले. आम्ही २०० टक्के प्रामाणिकपणे लशीच्या चाचण्या केल्या असूनही आमच्यावर टीका करण्यात येते, असे भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा इल्ला म्हणाले.