आयकर खात्याच्या कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी: रॉबर्ट वाड्रा


नवी दिल्ली: आपण कोणतीही कर चोरी केलेली नाही. आपल्याकडे लपविण्यासारखे काहीही नाही. आयकर विभागाची नोटीस मिळाल्यापासून आपण आयकर अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली आहे, सरकारने राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी केला.

रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे आयकर विभागाकडून करचुकवेगिरीबाबत चौकशी करण्यात आली. त्यांचा जबाबाही आयकर अधिकाऱ्यांनी नोंदवून घेतला. त्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आपण कोणताही कर चुकवलेला नाही. आपल्याकडे बेनामी संपत्ती नाही. आयकर विभागाला आपण पूर्ण सहकार्य केले असून त्यांच्या प्रत्येक प्रश्न किंवा शंकांना उत्तर दिली आहेत. लवकरच सत्य समोर येईल, असे वाड्रा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ज्या ज्या वेळी प्रियंका शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारतात किंवा अन्य मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरतात त्या त्या वेळी आयकर विभागासारख्या खात्यांकडून आपली चौकशी केली जाते. आपण आतापर्यंत सर्व शासकीय विभागांना सहकार्य करत आलो आहोत, असेही रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितले.