खोटे आश्वासन देऊन फसवणूक केल्या प्रकरणी मुंबई डबेवाला असोसिएशनच्या अध्यक्षांना अटक


पुणे – घाटकोपर पोलिसांनी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक केली असून सोमवारी रात्री तळेकर यांना पोलिसांनी कर्ज देण्यासंदर्भात खोटी आश्वासनं देऊन फसवणूक केल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली. ही अटकेची कारवाई मुंबईतील डबेवाल्यांच्या एका संघटनेने तळेकरांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

तळेकर यांना पुणे जिल्ह्यात असणाऱ्या त्यांच्या गावातून आमच्या एका टीमने ताब्यात घेतले. तळेकर यांना मंगळवारी सकाळी मुंबईत आणण्यात आले आहे. तळेकरांना आज पोलीस न्यायालयासमोर हजर करतील, अशी माहिती घाटकोपर पोलीस स्थानकातील वरिष्ठ निरिक्षक असणाऱ्या निती अलकनुरे यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

तळेकर यांच्यासोबतच त्यांचे साथीदार असणाऱ्या विठ्ठल सावंत यांच्याही या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये पोलीस मागावर आहेत. सावंत हे फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. मागील वर्षी म्हणजेच २०२० साली फेब्रुवारी महिन्यामध्ये तळेकरांविरोधात घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दुसऱ्या डबेवाल्या संघटनेतील २२ डबेवाल्यांच्या नावाने दुचाकी (मोपेड्स) घेण्यासाठी कर्ज घेतले. पण या डबेवाल्यांना त्यांनी दुचाकी दिल्या नसल्याचा आरोप तक्रारदार डबेवाल्यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात फसवणूक, विश्वासघात करणे या गुन्ह्यांखाली कारवाई केली आहे.