बिग बींची शेजारीन झाली जान्हवी कपूर: तब्बल 39 कोटींना विकत घेतले नवीन घर


निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर हिने अलीकडेच मुंबईत नवीन घर खरेदी केले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 39 कोटी रुपये इतकी तिच्या नवीन घराची किंमत आहे. जुहू येथील इमारतीतील तीन मजल्यांवर जान्हवीचे हे नवीन घर आहे. हे नवीन घर खरेदी केल्यानंतर जान्हवी आता अमिताभ बच्चन, अनिल कपूर, अजय देवगन आणि एकता कपूर यांची शेजारीन झाली आहे.

यासंदर्भात जीक्यू इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 4,144 स्क्वेअर फूट जागेतील जान्हवीचे हे घर इमारतीच्या 14, 15 आणि 16 व्या मजल्यावर आहे. जान्हवीने हा करार गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी केला आहे. तसेच तिने स्टँप ड्युटीसाठी 78 लाख रुपये भरले आहेत. सध्या वडील बोनी कपूर आणि धाकटी बहीण खुशीसमवेत जान्हवी लोखंडवाला येथे राहत आहे.

शशांक खेतान दिग्दर्शित ‘धडक’ या चित्रपटाद्वारे ईशान खट्टरसोबत जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या सैराट या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. यानंतर ती नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘घोस्ट स्टोरीज’ आणि ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ मध्ये झळकली आहे. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘रुही अफजाना’ आणि ‘दोस्ताना 2’ यांचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, ती लवकरच नयनतारा स्टारर ‘कोलामावू कोकिला’ च्या तामिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला पंजाबमध्ये सुरुवात होणार आहे.