८२ वर्षीय वृद्ध व्यक्तीला ब्रिटनमध्ये देण्यात आला ऑक्सफर्ड लसीचा पहिला डोस


ब्रिटन – ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यास ब्रिटनमध्ये आजपासून सुरुवात झाली आहे. ऑक्सफर्डच्या लसीचा पहिला डोस ब्रायन पिंकर या ८२ वर्षीय निवृत्त मॅनेजरला चर्चिल रुग्णालयात देण्यात आला. ही लस अत्यंत स्वस्तात उपलब्ध होणार असून कोरोनाची साथ या लसीमुळे संपुष्टात येईल, असे तज्ज्ञांना वाटते.

ही लस जगातील अनेक देशांमध्ये उपलब्ध होणार आहे. भारतातील पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्डच्या लसीचे उत्पादन करत आहे. ‘कोव्हिशिल्ड’ असे भारतात या लसीचे नाव आहे. भारतात ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाने विकसित केलेली लस आणि भारत बायोटेकच्या स्वदेशी कोव्हॅक्सिन लसीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास सरकारने परवानगी दिली आहे.

लसी ११० टक्के सुरक्षित आहेत, परंतु त्यांच्या सुरक्षिततेबद्दल थोडीशी शंका निर्माण झाली तरी आम्ही त्यांना मंजुरी देणार नाही, असे औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी स्पष्ट केले. कोव्हिशिल्ड ७०.४२ टक्के परिणामकारक, तर कोव्हॅक्सिन सुरक्षित असून उत्तम रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते, अशी पुष्टीही सोमानी यांनी जोडली.

औषध महानियंत्रकांनी कोरोना तज्ज्ञ समितीच्या अहवालाच्या आधारे दोन्ही लशींना आपत्कालीन वापराची परवानगी दिली असली तरी ‘कोव्हॅक्सिन’ला मंजुरी देताना मर्यादित वापरासाठी परवानगी देत असल्याचे म्हटले आहे. औषध महानियंत्रक डॉ. सोमाणी म्हणाले की तज्ज्ञ समितीच्या अहवालाआधारे सीरम आणि भारत बायोटेक यांच्या लशींना परवानगी देण्यात आली आहे. लसी दोन मात्रेत द्यायच्या असून त्या २ ते ८ अंश तापमानात साठवून ठेवता येतील.